

भोकरदन ः जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ सहायक व वरिष्ठ सहायक लिपिकांची पदे एकत्र करण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांचेकडे लिपिक संघटनेची मागणी केली आहे. या संदर्भात मंत्री जयकुमार गोरे यांच्या मंत्रालयीन दालनात संघटनेची बैठक संपन्न झाली.
निवेदनात म्हटले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांची पदे एकत्र करावीत अशी मागणी लिपिक संघटनेच्या वतीने राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मांडली. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कनिष्ठ किंवा वरिष्ठ लिपिकांच्या कामकाजात सध्या कोणताही फरक राहिलेला नाही.
संगणकीय युगात दोन्ही पदांवरील कर्मचारी यांचे कामकाज आता एकसारखेच झाले आहे. शिवाय कनिष्ठ सहायक लिपिकांची शैक्षणिक अर्हतादेखील वरिष्ठ सहायक लिपिकांपेक्षा जास्त आहे. त्यांना पदवीधर तर असावेच लागते शिवाय एमएससीआयटी व मराठी आणि इंग्रजी टायपिंगही पूर्ण असावे लागते.
कनिष्ठ आणि वरिष्ठ सहायक लिपिकांचे सध्याचे कामकाज, ही दोन पदे एकत्र केल्यावर त्यामुळे होणारा कामकाजामधील बदल आणि एकत्रितकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा यांमध्ये होणारा बदल अनुकूल होईल की प्रतिकूल होईल याबाबत शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अहवाल घ्यावेत व ही दोन पदे एकत्र करावीत अशी विनंती राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी बैठकीत मांडली.
यापूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांचेकडे लिपिक संघटनेच्या दोन बैठका संपन्न झाल्या आहेत . त्याप्रमाणे संघटनेच्या मागणीनुसार सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी ही दोन पदे एकत्र करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याबद्दल लिपिक संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी आभार मानले.