

Crop growth slowed down due to lack of rain, double sowing crisis
शिवनाथ जाधव
टाकरवण : माजलगाव तालुक्यातील टाकरवन व परिसरातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरिपाचा हंगाम चांगलाच आव्हानात्मक ठरत आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. ढगाळ हवामान असून फक्त रिमझिम पडत आहे. परिणामी कापूस, सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
पावसाच्या अभावामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. काही भागांत पिकांची मुळे सडू लागली आहेत, तर काही ठिकाणी पिके पिवळी पडत असल्याचे चित्र आहे. सोयाबीन पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. सामान्यतः जून-जुलै महिन्यांमध्ये या भागात ५०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा असते. मात्र यंदा केवळ १०० ते १५० मिलिमीटर पाऊस झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. विहिरी कोरड्या पडत चालल्या आहेत आणि नदी-नालेही अजून भरलेले नाहीत. टाकरवणसह परिसरातील ९० टक्के क्षेत्रात कापूस व सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र आता पिके वाचवणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
या संकटात भर म्हणून हरीण व इतर वन्यप्राण्यांचे कळप रात्रीच्या वेळी शेतामध्ये घुसून कोवळी पिके फस्त करत आहेत. या प्राण्यांच्या संख्येमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून, वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकऱ्यांनी आधीच बियाणे, खते, औषधे यावर हजारो रुपये खर्च केले आहेत. पावसाचा लवकर होणारा उशिर अजून वाढला, तर संपूर्ण हंगाम हातचं जाईल अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.