

Opposition to paying bogus bill, Deputy Sarpanch brutally beaten up
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथे बोगस काम करून त्याचे बिल देण्यास विरोध के ल्याच्या कारणावरून उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना भररस्त्यात चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१३) घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना लोखंडी पाईप, कोयता व दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली असून, या मारहाणीत ते जबर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
जखमी चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसभेत बोगस बिले, चुकीच्या कामास विरोध केल्यामुळे काही लोकांनी त्यांच्यावर सूडबुद्धीने हल्ला केला. गाडी अडवून अचानकपणे अमानुष मारहाण करण्यात आली.
मला आणि माझ्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकीही दिली, असे त्यांनी सांगून याबाबत मागील काही दिवसांपासून विरोधक तुझा संतोष देशमुख करू, अशा धमक्या देत असल्याचेही उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी यावेळी सांगितले.