

The stone building of the Kotharban Zilla Parishad School in Vadvani taluka has become dangerous.
वडवणी, पुढारी वृत्तसेवाः वडवणी तालुक्यातील कोठारबन जिल्हा परिषद शाळेची पुरातन दगडी इमारत ही कुजून अतिशय धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. तब्बल २०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेली ही तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी शाळा आज अक्षरशः कोसळण्याच्या वाटेवर आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून तर विद्यार्थी आणि शिक्षक सगळेच जीव मुठीत घेवून या शाळेत येत आहेत.
ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून जिर्णावस्थेत आहे. इमारतीच्या भिंतींना मोठी भगदाडे पडलेली असून, काही वर्ग खोल्यांची पत्रे उडून गेलेली आहेत तर दरवाजा व त्याच्या चौकटी उन्मळून पडण्याच्या स्थितीत आहेत.
पावसाच्या पाण्यामुळे काही वेळा त्या भितींना विद्युत प्रवाह उतरतो असा गंभीर आरोप शाळकरी मुलांनी केला आहे. दरम्यान याठिकाणी शाळेत बसायलाही भिती वाटते, अशी प्रतिक्रिया आठवीची विद्यार्थिनी प्राजक्ता भोसले हिने दिली आहे. या गोष्टींमुळे गावातील पालकही प्रचंड अस्वस्थ आहेत. काही दिवसांपूर्वीच जोराच्या वाऱ्यामुळे शाळेवरचे पत्रे उडून गेले, व त्यामुळे संपूर्ण वर्ग ओला झाला. सरकार म्हणतं शिक्षण द्या, पण मुलं कुठं शिकणार? छप्परच उडालंय ! असा सवाल गावकरी पालक भगवान मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
या सर्वांमध्ये शाळेचे शिक्षकही कमालीचे त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, शिकवतांना दरवाजाकडे वळून कुठं भिंत पडेल याकडे लक्ष ठेवावं लागतं, असं सांगताना शिक्षकांच्या डोळ्यातील चिंता स्पष्ट जाणवत होती. थोड्याच दिवसांत रस्त्यावर शाळा भरवावी लागेल अशी प्रतिक्रिया भस्करे यांनी यावेळी व्यक्त केली. या मुलांच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत, पण आज त्यांच्या नजरेत भिती आहे. पाचवीचा विद्यार्थी उमेश म्हणतो, मला मोठं होवून डॉक्टर व्हायचंय, पण शाळा पडली तर आम्ही कुठं शिकणार?
त्यामुळे अनेक विद्याथ्यर्थ्यांनी एकमुखाने सरकारकडे विनंती केली आहे की, सरकार मायबाप आम्हाला फक्त शाळा बांधून द्या, शिक्षण घेणं बाकी आम्ही पाहू. कोठारबन शाळेच्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा झाला आहे. गावकरी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सगळ्यांचीच एकच मागणी आहे, नविन इमारत, सुरक्षित शिक्षण आणि मुलांच्या भविष्यासाठी तात्काळ निर्णय. दरम्यान सरकारने फक्त आकड्यांवरुन योजना आखू नयेत, तर जमिनीवरची परिस्थिती ओळखावी.
शाळा केवळ इमारत नसते, ती हजारो मुलांच्या स्वप्नांची जागा असते. कोठारबनच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतले स्वप्नं कोसळू नयेत, यासाठी आजच पावलं उचलणं आवश्यक आहे असे स्पष्ट मत लोक पत्रकार बप्पासाहेब भांगे यांनी यावेळी व्यक्त केले. सरकार मायबाप, आम्हाला आमची शाळा बांधून द्या! ही केवळ मागणी नाही, ही ग्रामीण विद्याथ्यर्थ्यांच्या मनातली आशा आहे. या सर्व विद्यार्थी आणि शिक्षण यांच्या स्वप्नाकडे सरकार कस पाहत हे पाहण औत्सुक्याचे असेल.