

Bus left the road due to broken rod
धारूर, पुढारी वृत्तसेवा धारूर एस.टी. आगाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच नादुरुस्त बसचा स्टेअरिंग रॉड तुटून दोन वेळा रस्ता सोडल्याची घटना घडली असून, प्रवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २० बीएल २८२१ क्रमांकाची बस, दि. २६ ऑक्टोबर रोजी बीड-धारूर मार्गावर पारगावजवळ, स्टेअरिंग रॉड तुटल्याने रस्त्याबाहेर गेली होती. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, तरीही बसचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतर संबंधित बस दुरुस्त न करता, केवळ तीन दिवसांनंतर म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली, ही बाब अतिशय गंभीर मानली जात आहे.
२९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता बीड-धारूर मार्गावर प्रवासादरम्यान पुन्हा एकदा त्याच बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. या वेळी बस चालक शेख यांनी तत्काळ सावधानता बाळगत बस रस्त्याच्या कडेला थांबवली, ज्यामुळे प्रवाशांचा जीव वाचला. एकाच नादुरुस्त बसला पुन्हा प्रवासासाठी का सोडण्यात आले? प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वर्कशॉपमधील वाहन तपासणी आणि दुरुस्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रवाशांचा सवाल
नादुरुस्त बस दुरुस्त न करता प्रवासासाठी सोडणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ नाही का? या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.