

Heavy rains cause major damage to cotton; Production reduced by half
गेवराई, पुढारी वृत्तसेवा: 'शेतकऱ्याच्या नशिबी नेहमीच आभाळच येते!', या म्हणीला यंदाचा खरिप हंगाम जणू मूर्त स्वरूप देतो आहे. गेवराई तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून निसर्गाच्या कोपाला तोंड देत आहेत. आधी अतिवृष्टीने पिक उध्वस्त झाले, आणि आता परतीच्या पावसाने कपाशीवर अक्षरशः पाणी फिरवले आहे. एकेकाळी शेतावर शुभ्र शुभ्र कापसाचे बोंडे चमकत असायच्या, त्या आता वाती बनून काळवंडून जमिनीत लोळत आहेत.
गेवराई तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा कपाशी हेच प्रमुख पीक घेतले होते. उधारीने बियाणं, उसनवारखतं, कधी घरातील दागदागिने गहाण ठेवून लागवड केली. भरघोस उत्पादन होईल, असा विश्वास होता. पण ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीने कपाशीच्या उत्पादनाचा कणा मोडला. शेतकऱ्यांनी उरलेल्यावर भरोसा ठेवून वेचणीला सुरुवात केली होती; पण अवकाळी पावसाने तोच थोडा आशेचा किरणही भिजवून टाकला.
भिजलेल्या कापसामुळे वेचणीच्या वाती काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे कापसाचा दर्जा घसरला असून व्यापाऱ्यांनी दरात चक्क अध्ययन कपात केली आहे. बाज-ारात पांढऱ्या कापसाला ७ हजार रुपयांचा भाव असताना, काळा पडलेला कापूस आता फक्त ३५०० ते ४००० रुपये क्विंटल दराने घेतला जातोय. मागील तीन वर्षांपासून कपाशीचे दर स्थिरावलेले नाहीत. आता अवकाळीने त्या भावावरही घाला घातला आहे.
खासगी व्यापारी 'भिजलेला कापूस घेणार कोण?' या कारणावरून दर कमी करत आहेत. शेतकऱ्यांच्या हाती परत काहीच राहत नाही. पहिल्या वेचणीसाठीच मजुरांचे दर दहा रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत, भिजलेल्या पिकात मजूर उतरण्यास तयार नाहीत. काही मजूर येत असले तरी त्यांचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. एका बाजूला उत्पादन घटलं, दुसऱ्या बाजूला खर्च वाढला शेतकऱ्यांच्या गणिताचा ताळमेळच बसत नाही.
दर वर्षी आश्वासनांच्या छत्राखाली शेती उभी असते, पण त्यातून हातात काहीच लागत नाही. गेवराईतील शेतकरी आता शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत, कारण या अवकाळीने केवळ कपाशीच नाही तर त्यांच्या घरचं 'कपडं आणि पोट' दोन्ही हिरावून नेलं आहे.