

BSNL services in Dharur have been stalled for six days.
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यात मागील सहा दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ची मोबाईल नेटवर्क, कॉलिंग व इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सेवेअभावी शासकीय कामकाज, बँक व्यवहार, ऑनलाइन सेवा तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.
तालुका ठिकाण असूनही धारूर येथे बीएसएनएलचे स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना केज येथे जावे लागत असून, तेथील अधिकाऱ्यांकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
वायर कट झाल्यामुळे सेवा बंद आहे; मात्र संबंधित विभाग आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे उत्तर केज येथील अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. दरम्यान, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, बँका तसेच ऑनलाइन सेवा केंद्रांवर या ठप्प सेवेचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
विशेषतः ग्रामीण प्रशासनाच्या भागातील नागरिकांना दैनंदिन व्यवहार करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सहा दिवस उलटूनही सेवा पूर्ववत न झाल्याने बीएसएनएल कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन सेवा सुरळीत सुरू करावी, तसेच धारूर येथे कायमस्वरूपी कार्यालय सुरू करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, लवकरात लवकर समस्या न सुटल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इश- ाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी लक्ष घालून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी धारूर तालुक्यातील ग्राहक, बँक चालक व ऑनलाइन सेवा केंद्र चालकांकडून करण्यात येत आहे.