

Blood testing service at Mahalab has been at a standstill for ten days!
धारुर, पुढारी वृत्तसेवा शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध असलेली महालॅबची रक्त तपासणी सेवा मागील दहा दिवसांपासून बंद असल्याने बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत आहे. शासन आणि संबंधित कंपनी यांच्यातील थकीत देयकांचा वाद सुरू असताना त्याचा आर्थिक भुर्दंड मात्र सर्वसामान्य रुग्णांना सहन करावा लागत आहे.
शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महालॅबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत किंवा सवलतीच्या दरात केल्या जातात. मात्र, संबंधित कंपनीची देयके प्रलंबित असल्याने ही सेवा बंद पडल्याचे सांगितले जात आहे. शासन आणि कंपनीतील आर्थिक व्यवहारांचा तिढा सोडविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच नागरी आरोग्य केंद्रांमध्ये या सेवेवर अवलंबून असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः गर्भवती महिलांना नियमित तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये पैसे मोजावे लागत आहेत. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांवर हा अतिरिक्त खर्च पडत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा मिळत नसल्याने आरोग्य व्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वासही डळमळीत होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय आणि आर्थिक वाद काहीही असला तरी त्याचा फटका रुग्णांच्या आरोग्याला बसणे गंभीर बाब आहे.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित कंपनीची प्रलंबित देयके अदा करावीत आणि महालॅबची सेवा पूर्ववत सुरू करावी, सेवा सुरू होईपर्यंत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून रुग्णांची गैरसोय टाळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अतीक इस्माईल मोमीन आणि महादेव साखरे यांनी केली आहे. आरोग्य विभागाने केवळ कागदी आदेशांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रुग्णालयांतील परिस्थिती सुधारण्याची गरज आहे.
दहा दिवसांपासून बंद असलेली रक्त तपासणी सेवा तातडीने सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा. अन्यथा, या प्रशासकीय निष्क्रियतेची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.