

गेवराई | गेवराई शहरातील कुंभार गल्ली परिसरात दोन गटांतील युवकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत तलवारीचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोन गटांतील युवकांमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यात तिघे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली असून, घटनेमागील कारणांचा शोध सुरू केला आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस अधिक तपास करत आहेत.