

बीड : बीड शहरातील अंकुश नगरमध्ये मंगळवारी (दि.6) दुपारी 2.30 च्या सुमारास प्लम्बिंगचे काम करणाऱ्या मजुराचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आधी मयताच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. मात्र गोळी न लागल्याने त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा कायद्याचा प्रश्न उपस्थितीत करण्यात येत असून आरोपी अजूनही फरार आहे. हर्षद तुळशीराम शिंदे (वय-38) असे मयत तरुणाचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंकुश नगरमध्ये दुपारी 2.30 च्या सुमारास हर्षद रस्त्यावर प्लम्बिंगचे काम करत होता. यावेळी त्याचे आणि आरोपी विशाल ऊर्फ बप्या सूर्यवंशीचे अज्ञात कारणावरून वाद झाले. या वादाचे नंतर रूपांतर थेट हत्यामध्ये झाल्यामुळे खळबळ उडाली.
विशाल ऊर्फ बप्याने भरदिवसा हर्षदवर जीवे मारण्याच्या हेतून स्वतःच्या पिस्टलमधून आधी गोळी झाडली. मात्र ती गोळी हर्षदने चुकवून पळ काढला.हे पाहताच विशालने त्याचा पाठलाग करत सतूरने त्याच्यावर वार केला. हे वार गंभीर स्वरूपाचे असल्याने हर्षदचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान घटनास्थळी शिवाजी नगर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस आरोपीचा शोध घेत होते.