

बीड ः बीडमध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वीच दोन संघटना समोरासमोर उभा राहिल्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अमॅच्युर खो-खो संघटनेने राज्य खो - खो असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजीत केली असून ती संघटना एका परिवारापुरती मर्यादित असल्याचा आरोप बीड जिल्हा खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.तानाजी आगळे यांनी केला आहे. तर पुर्वीच्या संघटनेचे खेळासाठी काहीही योगदान नव्हते, तिची संलग्नता रद्द झाल्यानेच आम्ही दुसरी संघटना स्थापन केली अशी माहिती संघटनेचे सचिव विजय जाहेर यांनी दिली.
राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यात आता खेळांमध्येही राजकारण सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. बीडमध्ये आज दि.18 डिसेंबरपासून राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन हे अमॅच्युर खो-खो असोसिएशनच्या वतीने करण्यात आले असून याला राज्यस्तरीय असोसिएशनची मान्यता आहे. यासाठीची तयारी देखील अंतिम टप्प्यात असून आज दुपारी या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
तत्पूर्वीच बीड जिल्हा खो-खो असोसिएशन या जुन्या संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.तानाजी आगळे यांनी पत्रकार परिषद घेत या स्पर्धेच्या आयोजकांवर आरोप केले आहेत. स्पर्धेचे आयोजन करणारे हे केवळ प्रसिद्धीसाठी हे सर्व करत आहेत, त्यांना खो-खो खेळाविषयी प्रेम नाही. या संघटनेत अनेक शासकीय अधिकारी-कर्मचारी असून त्यांनी केवळ स्वार्थापोटी ही दुसरी संघटना स्थापन केली आहे.
या संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंची फ सवणूक देखील होऊ शकते, असा आरोप प्रा.तानाजी आगळे व प्रा.चित्रा आगळे यांनी केला आहे.तर दुसरीकडे जुन्या संघटनेने आजवर कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. याउलट राज्य असोसिएशनची दिशाभूल करत अनेक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पाठवले.
जेव्हा ही बाब असोसिएशनच्या लक्षात आली, त्यावेळी त्यांच्या संघटनेची संलग्नता रद्द करण्यात आलेली आहे. आज होणाऱ्या स्पर्धा या राज्य असोसिएशनच्य मान्यतेनेच होत आहेत, राज्यस्तरीय संघटनेचे सचिव हे स्वतः या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती अमॅच्युर खो-खो संघटनेचे सचिव विजय जाहेर व अध्यक्ष ऋषीकेश शेळके यांनी दिली.
नवी संघटना शेळके परिवार लिमिटेड!
बीड जिल्ह्यात खो-खो खेळाडूंना संधी मिळावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. परंतु प्रा.जनार्धन शेळके हे मिळालेल्या पुरस्काराचे लेबल वापरुन प्रसिद्धी मिळवत आहेत. यापूर्वीच्या संघटनेत तेच सचिव होते, असे असतांना देखील त्यांनी नवी संघटना स्थापन करत शेळके परिवार, शेळके यांचे नातेवाईक व इतर काही अधिकारी अशांनी मिळून ही संघटना स्थापन केल्याचा आरोप देखील प्रा.तानाजी आगळे यांनी केला आहे.
स्पर्धेत 48 संघांचा सहभाग
आजपासून बीडमध्ये प्रारंभ होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुले व मुलींचे प्रत्येकी 24 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून राज्यस्तरीय असोसिएशनचे पदाधिकारी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी उपस्थित राहणार आहेत. खेळाडूंना कोणतीही अडचण होणार नाही, याकरिता आम्ही काळजी घेत असल्याची माहिती विजय जाहेर यांनी दिली.