Majalgaon sugarcane fire : वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे मोगऱ्यात पाच एकर ऊस जळाला
माजलगाव : तालुक्यातील मोगरा येथील शेतकरी मोहन कल्याण कुलकर्णी यांचा तोडणीस आलेला ऊस महावितरणच्या गलथान कारभारामुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वीज तार तुटून पडल्याने ही आग लागली असून, तब्बल पाच एकर उभा ऊस जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांत दुसऱ्यांदा याच शेतात अशी घटना घडली आहे.
मोहन कुलकर्णी यांची गट क्रमांक 4 मधील शेती असून, या शेतातून विद्युत वाहिनी जाते. मागील वर्षीदेखील याच शेतात विजतारीमुळे आग लागली होती. त्यावेळी महावितरणकडे तक्रार करूनही जिर्ण झालेली विजतार बदलण्यात आली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याच दुर्लक्षाचा फटका यंदाही बसला असून, तुटलेल्या विजतारीमुळे उसाला आग लागून संपूर्ण पिक जळाले.
आग लागल्यानंतर मोहन कुलकर्णी यांच्यासह गावातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वेगाने पसरल्याने ऊस वाचवता आला नाही. इतर शेतांमध्ये आग पसरू नये यासाठी शेतकऱ्यांनी मोठे प्रयत्न केले.या घटनेमुळे ऊस जळाल्यानंतर साखर कारखाने अशा उसाला 30 टक्के कमी दर देतात. त्यामुळे शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे. वारंवार तक्रार करूनही उपाययोजना न केल्याने महावितरणच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे महावितरणचा गलथान व दुर्लक्षपूर्ण कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, निष्काळजीपणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

