Beed News : पोलिसांनी जुळवला हरवलेल्या प्रेमाचा धागा

एएचटीयू व एलसीबीच्या संयुक्त कारवाईला यश; पोलिसांच्या संवेदनशीलतेचे कौतुक
Beed News
Beed News : पोलिसांनी जुळवला हरवलेल्या प्रेमाचा धागा File Photo
Published on
Updated on

Beed Son and mother reunite after seven years

बीड, पुढारी वृत्तसेवा : एका आई- वडिलांची सात वर्षांची तगमग, व्याकुळतेने भरलेली वाट पाहणारी नजर आणि अखेरचा तो क्षण, जेव्हा त्यांचा हरवलेला राजू पुन्हा त्यांच्या कुशीत परत आला. ही केवळ पोलिस तपासाची यशोगाथा नाही, तर भावनिक पुनर्मिलनाची विलक्षण कहाणी आहे, ज्यामागे एएचटीयू आणि एलसीबीच्या टीमचे अथक परिश्रम आणि संवेदनशील दृष्टी आहे.

Beed News
Illegal sand mining : तहसीलदार संदीप खोमानेंच्या आशीर्वादाने वाळूमाफियांचा हैदोस !

राजू काकासाहेब माळी (वय सध्या १६), हा २०१७ साली केवळ १० वर्षांचा असताना घरातून अचानक बेपत्ता झाला होता. आई वडील ऊसतोडीचा कामासाठी कर्नाटकात गेलेले. अशिक्षित आणि हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या पालकांनी राजू काही दिवसांत परत येईल, या आशेने तब्बल सहा वर्षे त्याच्या प्रतीक्षेत घालवली. मात्र, राजूचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर २०२३ मध्ये त्याच्या आईने पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही केस २०२५ च्या सुरुवातीला अँटी ह्युमन ट्रैफिकिंग युनिट (HTU) कडे वर्ग झाली. पीएसआय पल्लवी जाधव यांनी प्रकरणाची सखोल तपासणी करताना या घटनेच्या फाईलचा बारकाईने अभ्यास केला.

राजूची पार्श्वभूमी, त्याचे शिक्षक, आणि त्याच्याकडून निघून गेलेली माहिती यांचा मागोवा घेतला. शिक्षकांवर संशय आल्यामुळे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनानुसार एलसीबीच्या साहाय्याने तपास पुढे नेण्यात आला. पीएसआय श्रीराम खटावकर यांच्या तांत्रिक तपासामुळे राजूचा पत्ता लागला तो पुण्यात होता. तिथून त्याला विश्वासात घेऊन बीडला आणण्यात आले. आणि आज, पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या उपस्थितीत आईवडिलांची सात वर्षांनी आपल्या मुलाशी भेट झाली. या प्रसंगी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.

Beed News
Beed Rain : रानमळा शिवारात निसर्गाचा कहर, शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त

ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पीएसआय पल्लवी जाधव आणि पीएसआय श्रीराम खटावकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एएचटीयु व एलसीबीच्या टीमने असिफ शेख, आनंद म्हस्के, हेमा वाघमारे, उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, अर्जुन यादव, प्रदीप वीर, योगेश निर्धार यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. आज पोलिसांनी केवळ एक मुलगा शोधून काढलेला नाही, तर एक कुटुंब पुन्हा जोडले आहे. त्यांच्या संवेदनशील-तेचा, चिकाटीचा आणि माणुसकीच्या भावनेचा हा नम्र गौरव.

पोलिस अधीक्षकही गहिवरले

वयाच्या दहाव्या वर्षी घरातून निघून गेलेला मुलगा आणि आईच्या भेटीचा प्रसंग हृदयस्पर्शी होता. हा मुलगा आपल्या आईसह कुटुंबीयांच्या समोर आल्यानंतर काही क्षण निरव शांतता होती. आईने आपल्या मुलाला पाहताच हंबरडा फोडल्याने ही शांतता भंग झाली. आई-मुलाची ही भेट पाहताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक बंटेवाड यांचेही डोळे पाणावले.

आजचा क्षण माझ्यासाठी भावस्पर्शी

पोलिस दलातील माझ्या आजवरच्या कारकीर्दीत मी अनेक गुन्ह्यांचा तपास केला, अनेक आरोपी पकडले, कारवाईमध्ये सहभागी झालो. परंतु आजची आई आणि मुलाची भेट अवर्णनीय होती. माझ्या करिअरमधील आजवरचा सर्वात भावस्पर्शी हा क्षण होता अशी प्रतिक्रिया पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news