

Beed Political News Rajabhau Munde, Babri Munde met Ajit Pawar
बीड, पुढारी वृत्तसेवा माजलगाव मतदारसंघातील मोठे नाव असलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी आ. प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीमुळे आता भाजपात खळबळ उडाली असून दुसरीकडे माजलगाव मतदारसंघात आ. प्रकाशदादांना बळ मिळाल्याची चर्चा होत आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी येथील भाजप नेते राजाभाऊ मुंडे आणि भाजपचेच युवा नेते बाबरी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आ. प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वात मुंडे पिता-पुत्र राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
त्या अनुषंगाने बुधवारी दुपारी आ. प्रकाश सोळंके यांनी राजाभाऊ आणि बाबरी मुंडेंना सोबत घेऊन अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये विविध विषयांसह मुंडेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या दृष्टीने चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेऊन नव्याने जोडले जाणारे हे सहकारी निश्चितच जनतेच्या हितासाठी प्रभावी योगदान देतील असे आ. प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांच्या आगामी बीड जिल्हा दौऱ्यात हा पक्ष प्रवेश सोहळा होणार असून सभापती महादेव तोंडे व नगरसेवक सुधीर ढोले हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे आ. प्रकाश दादांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी जयसिंह सोळंके, बजरंग साबळे, भारत जगताप आदिंची उपस्थिती होती.
भाजपा आणि मुंडे घराण्याशी एकनिष्ठ म्हणून राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे यांची ओळख होती. वडवणी नगरपंचायत निवडणूकीवेळी पंकजा मुंडे यांनी मुंडेंना ताकद दिल्याने आंधळे कुटूंब भाजपापासून दुरावले होते. तसेच निवडणूकीत राष्ट्रवादीशी जवळीक साधल्याचे देखील दिसले होते. परंतु विधानसभा निवडणूकीत बाबरी मुंडे यांनी अपक्ष लढण्याचा घेतलेला निर्णय, त्यावरुन झालेले मतभेद यामुळे मुंडे कुटुंब भाजपापासून दरावले होते. त्याचा परिणाम आता पक्ष सोडण्यात झाला असून यानंतर माजी आमदार केशव आंधळे, संजय आंधळे हे वडवणी भाजपात सक्रीय झाल्याचे दिसत आहे.
वडवणीसह धारुरच्या डोंगर पट्ट्यात राजाभाऊ मुंडे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. एका दिवसात एकहाती निवडणूक फिरवण्याचा राजाभाऊ मुंडे यांचा हातखंडा संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. असा नेता आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने या भागातील जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूकीवर याचा परिणाम होऊ शकतो.