

Beed Political News
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या नूतन नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यावेळी चर्चा झाली तर फारुक पटेल यांच्या नाराजीची. नगराध्यक्षांसह आ. विजयसिंह पंडित हे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बसलेले असताना सर्वांना फेटा बांधला जात होता, परंतु पटेल यांनी मी गटनेता नाही मला फेटाही नको असे म्हणल्याने याची चर्चा होऊ लागली आहे.
बीडच्या नूतन नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी शुक्रवारी आ.विजयसिंह पंडित व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. बीड नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आली आहे. यामध्ये नगराध्यक्षपदी प्रेमलता पारवे या विजयी झाल्या, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे १९ व शिवसेने ३ असे २२ नगरसेवक विजयी झालेले आहेत.
सर्व मित्रपक्षांची मिळून फुले, शाहू, आंबेडकर आघाडी स्थापन करत दोन दिवसांपूर्वी गटनेतेपदी फारुक पटेल यांची निवड करण्यात आली. तसे पत्रदेखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यावेळी आनंदात अस लेले फारुक पटेल नगराध्यक्षपदाचा पदभार ग्रहण सोहळा सुरू असताना मात्र नाराज होते.
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आ. पंडित, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्यासह फारुक पटेल हे देखील उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षांना फेटा बांधल्यानंतर संबंधित व्यक्तीने आ. पंडित यांना फेटा बांधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी मला नको पटेल यांना बांधा म्हणताच पटेल त्या ठिकाणाहून उठून निघाले होते. त्यावेळी आ. पंडित यांनी त्यांना आग्रह करून पुन्हा बसवले व तुम्ही गटनेते आहात असे म्हणताच मी गटनेता नाही, मी गटनेता नाही असे फारुक पटेल म्हणत होते, तसेच फेटा देखील बांधायचा नाही असे म्हणत होते. यावेळी आ. पंडित यांनी आग्रह केल्यानंतर पटेल यांनी फेटा बांधला, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य नसल्याने हे नाराजीनाट्य चर्चेचा विषय ठरले.
उपाध्यक्षपदावरून ओढाताण
नगराध्यक्षपदी प्रेमलता पारवे या विराजमान झाल्यानंतर आता उपनगराध्यक्षपदावरून ओढाताण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. ज्येष्ठ नगरसेवक म्हणून मलाच उपनगराध्यक्षपद मिळावे अशी अपेक्षा पटेल यांची होती, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे सामाजिक समीकरण साधण्यासाठी अमर नाईकवाडे किंवा विनोद मुळूक यांना उपनगराध्यक्षपदी संधी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सर्व घडामोडींमुळे पटेल नाराज होते, अशी माहिती समोर आली आहे.