

Implement a 'zero tolerance' policy against illegal activities and anti-social acts.
लातूर, पुढारी वृत्तसेवा : अवैध धंदे, गुटखा विक्री, मटका, अवैध दारू विक्री व इतर समाजविघातक कृत्यांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण राबविण्याचे स्पष्ट आदेश नदिड पोलीस परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले. कर्तव्यात कसूर, भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात आली असून, भविष्यातही अशीच कठोर व पारदर्शक भूमिका कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे वार्षिक परीक्षण, तपासणी व प्रशासकीय आढाव्याच्या अनुषंगाने आठ दिवसांच्या दौऱ्यावर लातूर जिल्ह्यात आहेत. या दौऱ्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पोलीस मुख्यालय येथे जिल्हा पोलीस दलाची परेड तसेच विविध विशेष पथकांची प्रात्यक्षिके करण्यात आली.
या परेडचे परीक्षण पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. परेडचे संचालन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी शिस्तबद्ध, काटेकोर व नियोजनबद्ध पद्धतीने केले. परेडनंतर विविध विशेष पथकांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये माँब डिसपर्सल पथक, किट परेड, लाठी ड्रिल, स्कॉड ड्रिल, वाद्य पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक यांचा समावेश होता. आपत्कालीन परिस्थिती, जमाव नियंत्रण, दंगल नियंत्रण, दहशतवादी कारवाया तसेच संशयास्पद साहित्याच्या शोध व नाशासाठी पोलीस दल किती सज्ज, सक्षम व प्रशिक्षित आहे, याचे सविस्तर व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे सादरीकरण करण्यात आले.
शहाजी उमाप यांनी या सर्व प्रात्यक्षिकांची बारकाईने पाहणी करून पोलीस दलाच्या सज्जतेबाबत समाधान व्यक्त केले. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सेवासंबंधी अडचणी जाणून घेतल्या.
२६ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत शहाजी उमाप यांनी विविध पोलीस ठाण्यांना भेटी देऊन दैनंदिन कामकाज, अभिलेखांची पडताळणी, शस्त्रागाराची पाहणी, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच प्रलंबित व गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची सद्यस्थिती यांचा सविस्तर आढावा घेतला. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, तांत्रिक साधनसामग्री व वैज्ञानिक पुराव्यांचा प्रभावी वापर करून तपास अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व परिणाम-कारक करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. गुन्ह्यांचा निपटारा वेळेत होऊन दोषींना कायदेशीर शिक्षा मिळवून देणे हे पोलिसांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डिजिटल अरेस्टमधील फिर्यादीस रकमेचा परतावा
लातूर येथील एका सेवानिवृत्त नागरिकाची डिजिटल अरेस्ट या प्रकारातून ७१ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. गुन्हा नोंदवल्यानंतर सायबर पोलिस ठाणे मार्फत संबंधित बँकांशी पत्रव्यवहार, तांत्रिक तपास व न्यायालयाचे आदेश प्राप्त करून ४० लाख ६३ हजार ८७० रुपये इतकी रक्कम फिर्यादीस परत मिळवून देण्यात आली. या रकमेचा धनादेश प्रतिनिधिक स्वरूपात पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते संबंधित फिर्यादी यांना देण्यात आला. या प्रकरणी एकास अटक झाली आहे.