

Minor girl kidnapped Kej
केज : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणात केज पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या १२ तासांत मुलीची सुटका केली. या प्रकरणी तिच्या सावत्र भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. परळी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केज शहरातील एका महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. पतीच्या निधनानंतर संबंधित महिलेने लातूर येथील एका व्यक्तीसोबत पुनर्विवाह केला.
दि. १६ फेब्रुवारी रोजी महिलेची १४ वर्षे ७ महिने वयाची, दहावीमध्ये शिकणारी मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा शाळेत गेले होते. दुपारी सुमारे १ वाजता शाळा सुटल्यानंतर मुलगा घरी परतला; मात्र मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. चौकशीदरम्यान ती बसस्थानकाकडे गेल्याची माहिती मिळाली; मात्र पुढील शोधात ती आढळली नाही.
यानंतर मुलीच्या आईने त्याच दिवशी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसऱ्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलाने, म्हणजेच मुलीच्या सावत्र भावाने, अज्ञात कारणासाठी फूस लावून तिचे अपहरण केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला.
तक्रार नोंद होताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि पोलीस नाईक शिवाजी कागदे यांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला.
दरम्यान, परळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस नाईक शिंदे व महिला पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने परळी बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान परळी रेल्वे स्थानकाजवळ पीडित मुलगी आणि तिचा सावत्र भाऊ पोलिसांना आढळून आले. त्यानंतर मुलीची सुरक्षित सुटका करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली. रात्री ११ वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हाती घेत दि. १७ फेब्रुवारी रोजी अवघ्या १२ तासांच्या आत मुलीची सुटका करण्यात यश मिळवले. या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईबद्दल पोलिस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.