

Kej Criminal complaint against sarpanch
केज : गावातील विकासकामांवरील तक्रारींची पाहणी सुरू असताना, मध्यस्थी करून भांडण थांबवण्यासाठी गेलेल्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील सुकळी येथे घडली.
८ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता आणि ग्रामपंचायत अधिकारी हे नाली बांधकामाची पाहणी करत होते. यावेळी सरपंच नितीन गायकवाड हे कचरा कुंडीविषयी बोलत असलेल्या अमोल विनायक गायकवाड यांच्यावर “तुझा काही संबंध नाही” असे म्हणून धावून गेले आणि त्यांच्या मारहाणीला सुरुवात केली.
मारहाण थांबवण्यासाठी उपस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते अमर मोहनराव गायकवाड पुढे येताच, सरपंचांनी त्यांच्यावरच संताप काढला. लाकडी काठीने मनगटाजवळ मारून त्यांना गंभीर दुखापत केली. सरपंचांचे साथीदार अक्षय बालासाहेब गायकवाड यांनी अमर गायकवाड यांच्या डाव्या डोळ्याजवळ काठीने प्रहार केला. प्रदीप भिसे यांनी त्यांच्या खांद्यावर व पाठीवर काठीने मारहाण केली, तर अनिकेत गायकवाड, ज्ञानेश्वर गव्हाणे आणि रविराज खाडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्याचबरोबर, “गावातील भ्रष्टाचाराबद्दल पुन्हा आवाज उठवला, तर जीवाने संपवू” अशी धमकीही दिल्याचे सांगितले जाते.
जखमी अमर गायकवाड यांच्यावर अंबाजोगाई येथील श्री स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात सरपंच नितीन साहेबराव गायकवाड आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत बरडे करत आहेत.