Parli Liquor Protest | दारूच्या व्यसनामुळे युवकाचा मृत्यू; साठेनगरमध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी नागरिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले
Parli Alcohol Ban Demand
अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलेPudhari
Published on
Updated on

Parli Alcohol Ban Demand

परळी वैजनाथ : परळी शहरातील साठेनगर परिसरात एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला. संबंधित युवकाचा मृत्यू दारूच्या व्यसनामुळे झाल्याचा आरोप कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी केला असून, परिसरातील अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

मृत युवकाचे नाव सुरेश मस्के असे असून त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही साठेनगर परिसरातील तीन युवकांचा दारूच्या व्यसनातून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याचे आंदोलकांनी सांगितले.

Parli Alcohol Ban Demand
Parli Youth Drowns | दशक्रिया विधीसाठी गेलेल्या तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू

साठेनगर भागात अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्री आणि हातभट्टी दारूचे अड्डे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या दारूच्या आहारी जाऊन अनेक युवक व्यसनाधीन झाले असून, त्यामुळे कौटुंबिक कलह, मारहाण, आर्थिक नुकसान आणि कुटुंबांचे विघटन अशा गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक कष्टकरी कुटुंबे या व्यसनामुळे उद्ध्वस्त झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

दारूविक्री बंद करण्यासाठी यापूर्वीही दोन वेळा पोलीस ठाण्यासमोर उपोषण आंदोलन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांकडून केवळ तात्पुरती कारवाई होत असून काही दिवसांनंतर पुन्हा अवैध धंदे सुरू होतात, असा आरोप नागरिकांनी केला.

Parli Alcohol Ban Demand
Parli Crime | ऊसतोड मजुरांच्या उचल रकमेतून वाद; युवकाचे अपहरण, तिघे आरोपी ताब्यात

साठेनगर परिसरातील अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

या आंदोलनात माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, विद्यमान नगरसेवक नितीन रोडे, सामाजिक कार्यकर्ते, महिला तसेच साठेनगर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी नागरिकांशी चर्चा करून अवैध दारूविक्रीविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याचे व परिसरात प्रभावी दारूबंदी राबविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news