

Harshwardhan Tidke UPSC Rank 355
परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील पांगरी येथील भूमिपुत्र हर्षवर्धन अशोक तिडके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 355 वी रँक मिळवली. त्यांच्या या यशामुळे परळी तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.
हर्षवर्धन तिडके हे लातूर येथे कार्यरत असलेले कृषी अधिकारी अशोक तिडके यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंबाजोगाई येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण लातूर येथे पूर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. पुढे अकरावी व बारावीचे शिक्षण त्यांनी लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये पूर्ण केले.
उच्च शिक्षणासाठी त्यांनी देशातील नामांकित शिक्षणसंस्था आयआयटी पवई येथे प्रवेश घेतला आणि तेथून पदवी शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे कोणतेही स्पर्धा परीक्षेचे कोचिंग क्लास न लावता स्वतःच्या जिद्द, परिश्रम आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.
हर्षवर्धन तिडके यांचे हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.