Beed news | राक्षसभूवन वाळू घोटाळ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून ड्रोनद्वारे चौकशी; ४० जणांचे विशेष पथक नियुक्त

चार गटांमध्ये विभागण्यात आलेल्या या पथकात मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक आणि ग्रामसेवकांचा समावेश आहे
Drone
DronePudhari
Published on
Updated on

गेवराई : तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात घरकूल लाभार्थ्यांच्या नावावर हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा करून त्याची खुलेआम विक्री झाल्याच्या गंभीर आरोपांनंतर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी स्तरावर तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वेग आला असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे.

राक्षसभूवन येथील गोदापात्राची जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोनच्या साहाय्याने पाहणी सुरू केली असून अवैध उत्खननाचे क्षेत्र, तयार करण्यात आलेले अनधिकृत रस्ते तसेच वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले मार्ग यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. ड्रोनद्वारे मिळालेल्या छायाचित्रे व व्हिडिओच्या आधारे सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असून त्यामुळे अवैध उपशाचे ठोस पुरावे प्रशासनाच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

Drone
Beed News | बोहल्यावर चढण्यापूर्वीच पीएसआय तरुणाने बंदुकीचा धाक दाखवत लग्नाला दिला नकार, मुलीच्या कुंटूंबियाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

दरम्यान, घरकूल योजनेअंतर्गत ज्यांच्या नावावर वाळू उचलल्याची नोंद आहे, अशा सर्व लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ४० जणांचे विशेष पथक नियुक्त केले आहे. चार गटांमध्ये विभागण्यात आलेल्या या पथकात मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक आणि ग्रामसेवकांचा समावेश आहे. प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्याला प्रत्यक्षात वाळू मिळाली का, ती घरकूल बांधकामासाठी वापरण्यात आली का, तसेच बांधकामाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती संकलित करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांनी राक्षसभूवन परिसरात कारवाई करत सात हायवा वाहने ताब्यात घेतली होती. या वाहनांमध्ये वाळू भरली जात असताना त्यांच्याकडे साष्टीपिंपळगाव येथील टेंडरच्या पावत्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राक्षसभूवनच्या गोदापात्रातून साष्टीपिंपळगाव टेंडरच्या नावाखाली वाळू वाहतूक कशी सुरू होती, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

Drone
Illegal Sand Transport | व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस, महसूल प्रशासनाची पोलखोल; हिंगोली जिल्ह्यात ‘हप्ता’ चर्चेने खळबळ

या प्रकरणात चकलांबा पोलिसांनी यापूर्वी दुर्लक्ष केले का, तसेच राक्षसभूवन परिसरात अनधिकृत रस्ते कोणाच्या आशीर्वादाने तयार करण्यात आले, याचीही चौकशी होणार असल्याचे समजते. स्थानिक महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेचीही कसून तपासणी केली जाणार आहे.शासकीय टेंडरमधून घरकूल लाभार्थ्यांसाठी दहा टक्के वाळू राखून ठेवण्याची तरतूद असताना राक्षसभूवनच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्याचा प्रयत्न का झाला, याबाबत परिसरात तीव्र चर्चा सुरू आहे. स्थानिकांच्या मते, घरकूल योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार करून कोट्यवधी रुपयांचा फायदा काही घटकांनी मिळविल्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घरकूल योजना ही गरीब व गरजू नागरिकांसाठी असल्याचे स्पष्ट करत या योजनेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर फौजदारी तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Drone
Nagar Manmad Highway Diesel Theft Gang: नगर-मनमाड महामार्गावर डिझेल चोरी टोळीचा पर्दाफाश; चार जणांना अटक

दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याची तयारी सुरू असून त्यामुळे राक्षसभूवन परिसरातील कथित वाळूमाफिया तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या घटकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या या हालचालीमुळे आता या बहुचर्चित वाळू प्रकरणातील सत्य समोर येणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news