

गेवराई : जनतेचे रक्षण आणि न्याय देण्याची जबाबदारी असलेल्या वर्दीतील अधिकाऱ्यावरच एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप झाल्याने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना पीएसआय पदावर कार्यरत असलेल्या तरुणाने अचानक लग्नास नकार दिल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणामुळे “कुंपणानेच शेत खाल्ले का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. मातोरी येथील या प्रकरणाची जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू असून चकलांबा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
साखरपुड्यानंतर लग्नाची तयारी; लाखोंचा खर्च
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पीएसआय पवन निंबाळकर यांनी लग्नाचे आश्वासन देत साखरपुडा केला. त्यानंतर लग्नासाठी सोने, कपडे तसेच विविध साहित्याची खरेदी करण्यात आली. कुटुंबीयांनी कष्टाने जमा केलेली आयुष्यभराची पुंजी मुलीच्या लग्नासाठी खर्च केली.
घरात लग्नाची लगबग सुरू असताना आणि निमंत्रण पत्रिका वाटपाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाकडून अचानक लग्नास नकार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक, आर्थिक आणि सामाजिक धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात सर्वाधिक गंभीर आरोप म्हणजे संबंधित अधिकाऱ्याने बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रारीत हा आरोप नमूद केला असून, “ज्या वर्दीवर विश्वास ठेवून सामान्य माणूस न्यायासाठी पोलीस ठाण्यात जातो, त्याच वर्दीतील अधिकाऱ्याने आमच्या मुलीच्या आयुष्याशी खेळ केला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
“बंदुकीचा धाक दाखवत धमकावले”
“आम्ही पै-पै साठवून मुलीच्या लग्नाची तयारी केली होती. समाजात प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र ऐनवेळी नकार देऊन आमची अब्रू, पैसा आणि मुलीचे भविष्य उद्ध्वस्त केले,” असा आरोप मुलीच्या वडिलांनी करून आम्हाला बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली असल्यचे मुलीच्या नातेवाईकांनी या तक्रारीत म्हटले आहे.
चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात पीएसआय पवन निंबाळकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाला दुसरे वळण मिळाले असून पवन निंबाळकर यांच्या भावानेही चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांनी चुकीची माहिती देऊन फसवणूक केल्याचा दावा त्यांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवले जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप होत असल्याने पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपासानंतरच नेमकी सत्य परिस्थिती स्पष्ट होणार असली, तरी या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वर्दीतील अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून, या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.