

Beed News: Dr. Pritam Munde's public relations tour discussed
बीड : शशी केवडकर
बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या भाजपकडून संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा कालावधी असतानाच काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गावपातळीवर संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या जिल्हाभर सुरू असलेल्या लोकसंपर्क दौऱ्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. गेवराईपासून सुरू झालेला हा दौरा माजलगाव, धारूर, अंबाजोगाई, परळी, पाटोदा, आष्टी आणि कडा या भागांत पोहोचला असून, या माध्यमातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या समीकरणात ऐनवेळी बदल झाला. उमेदवारी न मिळाल्यानंतरही डॉ. प्रीतम मुंडे यांनी नाराजी व्यक्त न करता पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारली. पराभवानंतर अनेक नेते काही काळ राजकीय सक्रियतेपासून दूर राहतात; मात्र डॉ. प्रीतम मुंडे यांनी संघटनात्मक कामकाजात सातत्य ठेवत पुन्हा प्रत्यक्ष संपर्काचा मार्ग स्वीकारला आहे.
या दौऱ्यात औपचारिक सभांपेक्षा प्रत्यक्ष संवादावर अधिक भर देण्यात आला. कार्यकर्त्यांच्या घरी भेटी, स्थानिक नागरिकांशी चर्चा, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि कडा गावातील टपरीवरील चहापान अशा स्वरूपाच्या भेटींमधून स्थानिक पातळीवरील वातावरणाचा आढावा घेण्यात आला. या भेटींना केवळ औपचारिकता न मानता आगामी राजकीय तयारीचा भाग म्हणून पाहिले जात आहे.
भाजपच्या गोटात सध्या एक बाब ठळकपणे जाणवत आहे. पराभवाच्या कारणांचा शोध केवळ जातीय समीकरणे पुरता मर्यादित न ठेवता बूथ पातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे बूथ समित्या, पन्ना प्रमुख, सर्कल प्रमुख तसेच तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन संघटन पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्लीतील निर्णय आणि घोषणा मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायच्या असतील, तर स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे सक्षम असणे आवश्यक असल्याचे पक्षातील नेत्यांचे मत आहे.
बीडचे राजकारण आता पूर्वीइतके सरळ राहिलेले नाही. विविध समाजघटकांचे एकगठ्ठा मतदान, स्थानिक प्रश्न, बदलती राजकीय समीकरणे आणि महायुती मधील बिघाडी यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत स्वतंत्रपणे पोहोचण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच डॉ. प्रीतम मुंडे यांचा हा दौरा केवळ भेटीगाठींपुरता मर्यादित नसून मतदारसंघातील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
दौऱ्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी "तुम्ही खासदार असायला हवे होत्या" अशी भावना व्यक्त केल्याचे समजते. विकासकामांच्या पाठपुराव्याबाबतही चर्चा झाली. या भावना भविष्यात मतांमध्ये कितपत रूपांतरित होतात, हे येणारा काळच ठरवेल; मात्र भाजपने पराभूत मतदारसंघाकडे दुर्लक्ष न करता पुन्हा संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. विरोधकही या दौऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत.
कारण बीडमध्ये स्थानिक पातळीवर सुरू झालेली प्रत्येक हालचाल आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे टपरीवरील चहापानासारख्या साध्या वाटणाऱ्या भेटीही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरत आहेत. पुढील तीन वर्षांत या संपर्क मोहिमेतून किती राजकीय बळ निर्माण होते आणि संघटन किती मजबूत होते, यावरच बीडमधील आगामी लोकसभा लढतीचे समीकरण अवलंबून राहणार आहे. कारण बीडमध्ये निवडणुका पाच वर्षांनी होतात; मात्र राजकारण हे कायम सुरू असते..!
लोकसभा निडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये पक्षाला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे या आ मंत्री आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आतापासून निवडणूक तयारी सुरू केली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी अलिकडेच केलेल्या संपर्क दौऱ्यावरून या तयारीचे संकेत. मिळतात.