

गौतम बचुटे
केज : येथे एका अडत दुकानात मुनिम म्हणून काम करणाऱ्या नोकराने मालक उपचारासाठी बाहेर गेल्याची संधी साधून त्याच्याकडे सह्या करून ठेवलेल्या चेकचा गैरवापर केला. त्याने मालकाच्या परस्पर ३४ रु. स्वतःच्या खात्यावर वर्ग करून करून पळून गेलेल्या मुनीमाला केज पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
केज येथील हाजी मौला सौदागर यांच्या सौदागर ट्रेडिंग कं. नावाच्या आडत दुकानात धान्य खरेदी-विक्री आणि आर्थिक व्यवहाराची देखरेख करण्यासाठी धारूर येथील शेख शफीक शेख आतीक याला कामाला ठेवले होते. १७ जून रोजी हाजी मौला सौदागर हे पाठीच्या मणक्याच्या राजस्थान राज्यातील जोधपुर येथे उपचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी सह्या केलेले चार धनादेश त्यांचा मुलगा जिशान यास देण्यासाठी कपाटात ठेवायला मुनिम शफीक शेख याच्याकडे दिले होते. त्या चेकचा गैरवापर करून मुनिम शफीक शेख याने एकूण ३४ लाख रु. रक्कम त्याच्या खात्यावर वर्ग करून जमा करून घेतले.
त्यानंतर त्या खात्यातून काही रक्कम त्याने त्याचे आई वडिल यांच्या खात्यावर व काही रक्कम स्वतःच्या इतर खात्यावर वर्ग करून हाजी मौला सौदागर यांची फसवणूक करून गायब झाला होता. केज पोलिस ठाण्यात त्यांचा मुनिम शेख शफीक याच्या विरुद्ध गु. र. नं. ४३०/२०२६ भा. न्या. सं. ३१६, ३१८ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात केला होता.
शेख शफीक याला बीडमधून घेतले ताब्यात
तपास करीत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक असद शेख आणि मुंडे यांना शेख शफीक हा बीडमध्ये राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न मिळू देता त्याच्या मुसक्या आवळल्या. अखेर चेकचा गैरवापर करून मालकाची ३४ लाख रु. ची फसवणूक करणारा मुनीमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.