

Beed NCP MLA Prakash Solanke
शशी केवडकर
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्यातील प्रतिनिधीत्वाचा इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठींवर थेट शब्दांत खंत व्यक्त केली आहे. या जिल्ह्याने कायम पक्षावर, नेतृत्वावर प्रेम केलं; मात्र बहुजन समाजाला कधीच मंत्रिपदाच्या दृष्टीने योग्य संधी मिळाली नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी वस्तुस्थिती मांडली.
यावेळी आपले म्हणणे मांडताना ते म्हणाले की ज्यांनी पक्षावर, पक्षनेतृत्वावर नितांत प्रेम केलं, त्याच बहुजन समाजाला बीड जिल्ह्यात सातत्याने वाऱ्यावर सोडलं गेलं. एकदा नाही, तर प्रत्येक सत्तास्थापनेच्या वेळी हेच चित्र दिसलं असून याचा पक्षाश्रेष्ठींनीदेखील विचार करणे गरजेचे असल्याची खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सध्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील वादग्रस्त व्हिडीओवरून उठलेल्या चर्चा आणि टीकाटिप्पणीवरही सोळंके यांनी प्रतिक्रिया दिली. कोकाटे यांच्या कामगिरीकडे पाहिलं, तर कृषी विभागात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगली कामं केली आहेत.
काही खोडसाळ मंडळी त्यांच्या बदनामीसाठी अशा प्रकारचा व्हिडीओ पेरत आहेत. एका व्हिडीओच्या आधारे त्यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यमापन करणं चुकीचं आहे, असे म्हणत त्यांनी कोकाटेंच्या बाजूने ठाम उभं राहण्याचं संकेत दिले. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला असताना, आ. सोळंकेंनी थेट पक्षश्रेष्ठींना उद्देशून मांडलेली खंत हा केवळ भावनिक उद्गार नसून, भविष्यातील मंत्रिपदाच्या दावेदारीसाठी एक प्रकारची भूमिका मांडणे असल्याचं जाणकारांचे मत आहे.
बीडसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यातील बहुजन समाजदेखील आता आपले प्रतिनिधित्व, सत्ता-संघर्ष आणि न्याय या मुद्द्यांवर आवाज उठवत आहे. आ. सोळंके यांची ही खंत केवळ व्यक्तिशः नाराजी नसून एक समाजप्रवाहाला राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी खेळलेली नीती आहे.