

बीड : उदय नागरगोजे
आठ ते दहा महिन्यापूर्वी बीड नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलेल्या राष्ट्रवादी समोर आता पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान निर्माण झाले आहे. क्षीरसागर यांना विरोध करत राष्ट्रवादीची बीड नगर पालिकेतील सत्ता स्थापन झाली परंतु आता ती टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यामध्ये आमदार विजयसिंह पंडित कसे यशस्वी होतात? हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे.
बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असला तरी संख्या बळात मागे असलेल्या राष्ट्रवादीने उपाध्यक्ष व इतर सभापतीपद देखील मिळवलेले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीपूर्वी बीड शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडी झाल्या होत्या. त्यामध्ये त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी थेट भाजपात प्रवेश केला होता.
परिणामी गेवराई विधानसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीची मोट बांधण्याचे काम केले होते. नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान स्वर्गीय अजित पवार यांनी बीडमध्ये दोन सभा घेतल्या होत्या. यामध्ये बीडकारांना विकासाचे आश्वासन देत नगरपालिका ताब्यात देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बीडच्या जनतेने नगराध्यक्षांसह मोठ्या संख्येने नगरसेवक देखील राष्ट्रवादीचे निवडून दिले.
या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार विजयसिंह पंडित यांनी मोठी राजकीय मांडणी करत बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. निवडणुकीवेळी एकसंघ असणारी राष्ट्रवादी काँग्रेस बीडच्या विकासासाठी मोठे योगदान देईल अशी अपेक्षा बीडकारांना निर्माण झाली होती.
प्रारंभीच्या काही दिवसात तसे चित्रदेखील दिसले परंतु गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादीची घडी विस्कटली की काय? अशी शंका येऊ लागली होती. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते फारूक पटेल यांनी स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्यावर थेट निशाणा साधला होता. याबरोबरच राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष यांच्यामध्ये देखील शाब्दिक वाद निर्माण झाल्याने राष्ट्रवादीच्या घड्याळाचे हे काटे वेगवेगळ्या दिशेने फिरत असल्याचे समोर आले होते.
या सर्व घडामोडी होत असतानाच एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने बीडचे आमदार संदीप क्षीरसागर व भाजप नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर हे एकत्र आले होते. व्यासपीठावरील त्यांचा वावर पाहिल्यास क्षीरसागर बंधू पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न चर्चिला जात असतानाच या दोन्ही भावांची प्रतिक्रिया देखील समोर आली होती.
बीड नगरपालिकेत सुरू असलेल्या घडामोडी च्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना बीडच्या विकासासाठी काही परिस्थिती निर्माण झाल्यास आणि निर्णय घेण्याची वेळ आल्यास आम्ही एकत्र येऊ शकतो असे संकेत या दोघा भावांनी दिले होते.. तेव्हापासून बीडच्या नगरपालिकेत पुन्हा एकदा क्षीरसागर पर्व सुरू होणार का? अशी चर्चा रंगली आहे.
तर दुसरीकडे आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड नगरपालिकेच्या अध्यक्षपदी पुढील पाच वर्ष प्रेमलता पारवे याच राहतील याबरोबरच उपाध्यक्ष देखील राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल ही काळा दगडावरची पांढरी रेघ आहे असे म्हटले होते.
क्षीरसागर बंधूंनी एकत्र येण्याचे दिलेले संकेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली गटबाजी एकीकडे आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी केलेला दावा एकीकडे... या सर्व घडामोडी पाहता आगामी काळात राष्ट्रवादी मधील गटबाजी थांबवण्यात आणि एक हाती वर्चस्व मिळवण्यात आमदार विजयसिंह पंडित यशस्वी होतात का? की काही वेगळा प्रयोग बीडच्या नगरपालिकेमध्ये करून क्षीरसागर पुन्हा एकदा सत्तेत येतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वर्चस्व कायम ठेवण्याचे आ. पंडितांसमोर आव्हान
बीड शहराच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते यासह इतर विकास कामांच्या प्रश्नावर बीडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला होता. परंतु विकास कामांच्या प्रश्नावरूनच राष्ट्रवादीमध्ये आता दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे क्षीरसागर बंधू देखील बीडच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो असे सांगत आहेत. सर्वांना बीडचा विकास करायचा आहे असे ते सांगत असले तरी सत्ता टिकवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी सुरू असलेले हे राजकारण थांबवून बीडचा विकासाचा वादा कोण पूर्ण करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
क्षीरसागर यांना विरोध करणारी मंडळीच पुन्हा आक्रमक
साधारणत: पाच वर्षांपूर्वी डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाला विरोध करत नगरसेवक अमर नाईकवाडे, फारुख पटेल व इतर काही नगरसेवकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवले होते. काही काळ त्या पद्धतीने त्यांनी काम देखील केले, परंतु त्यानंतरच्या काळात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापासून देखील ते वेगळे झाले परंतु राष्ट्रवादीत मात्र कायम होते.
नगरपालिका निवडणुकीपूर्वी याच मंडळींच्या हस्तक्षेपाच्या कारणावरून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी थेट भाजपा प्रवेश घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सूत्र आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे आली. त्यांच्या नेतृत्वाखाली बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सत्ता आल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात पुन्हा एकदा उपाध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुख पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे व इतर काही नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेची आता चर्चा होऊ लागली आहे.