Mumbai Pune Expressway Missing Link: बंदी झुगारुन मिसिंग लिंकवरुन अवजड वाहतूक; तीन महिन्यांत ६२१ वाहने धावली

साडेसात लाखांचा दंड,कठोर कारवाईचा इशारा
Mumbai Pune Expressway Missing Link
Mumbai Pune Expressway Missing LinkPudhari
Published on
Updated on

खोपोली: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) जड-अवजड वाहनांना, मालवाहू वाहनांना आणि ज्वलनशील, स्फोटक, धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी असताना मिसिंग लिंक सेवेत दाखल झाल्यापासून तीन महिन्यांत तेथे ६२१ बंदी असलेली वाहने धावली आहेत. या वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई करून ७ लाख ३८ हजारांचा दंड दंड वसूल करण्यात आला आहे.

बंदी असतानाही जड-अवजड, मालवाहू वाहने धावत आहेत, तर दुसरीकडे वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करत नसल्याचे चित्र आहे.

Mumbai Pune Expressway Missing Link
School Girls Viral Video: शाळकरी मुली बनल्या ‘रिपोर्टर’; छत्रीचा माईक करून खड्ड्यांची केली पोलखोल

७ ऑगस्टला झालेल्या मिसिंग लिंकवरील भीषण अपघातातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि महामार्ग पोलिसांनी बंदीच्या नियमासह वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचाही निर्णय घेतला आहे.

तीन महिन्यांपूर्वी वाहतूक सेवेत दाखल झालेल्या मिसिंग लिंकवर ७ ऑगस्टला मध्यरात्री भीषण अपघात झाला. एका चारचाकी वाहनाने मालवाहू टेम्पोला धडक दिली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले आहेत.

मिसिंग लिंकवरील बोगद्यात चारचाकी वाहनांसाठी ताशी ८० किमी अशी वेगमर्यादा असताना धडक दिलेली चारचाकी ताशी १५० किमी वेगाने धावत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. ज्या वाहनाला चारचाकीने धडक दिली ते वाहन मालवाहू टेम्पो होता आणि या वाहनास मिसिंग लिंकवर पूर्णपणे बंदी आहे.

Mumbai Pune Expressway Missing Link
National Highway Illegal Encroachments: महामार्गांवरील ढाबे, अतिक्रमणे दोन महिन्यांत हटविणार; राज्य शासनाचे परिपत्रक

या अपघातामुळे अमर्याद वेगाचा आणि बंदी असलेल्या वाहनांच्या सर्रास प्रवेशाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता एमएसआरडीसी आणि महामार्ग पोलिसांना अखेर जाग आली आहे.

वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याकरिता एमएसआरडीसी आणि महामार्ग पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविणे, प्रवेश व निर्गमन ठिकाणी अधिक कर्मचारी तैनात करणे, तसेच वाहनांची कठोर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवेशबंदी असलेली वाहने मोठ्या संख्येने मिसिंग लिंकवरून धावत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. तीन महिन्यांत बंदीचे उल्लंघन करणाऱ्या ६२१ अवजड वाहनांवर महामार्ग पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून ई-चलनाद्वारे ७.३८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचेही वसईकर यांनी सांगितले.

बंदीचे उल्लंघन होत असल्याने दंडाची रक्कम वाढविण्यासह वाहनमालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचाही विचार सुरू आहे. अपघात रोखण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे कठोर पालन करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

तीन महिन्यांत ५३ लाख वाहने धावली

तीन महिन्यांत मिसिंग लिंकवरून ५३.४३ लाख हलकी वाहने आणि २.६३ लाख बस धावल्या आहेत. तर १८.२७ लाख मालवाहू वाहने जुन्या भोर घाट मार्गाने गेली. सरासरी दररोज सुमारे २० हजार व्यावसायिक वाहने बोर घाटातून प्रवास करत आहेत.

मिसिंग लिंकवर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांवर थेट डिजिटल पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यासाठी बोगद्यांमध्ये अत्याधुनिक ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. नियंत्रण कक्ष उभारून देण्याचीही त्यांची मागणी आहे. त्यानुसार या पायाभूत सुविधा लवकरच आम्ही उभारून देणार आहोत.

- राहुल वसईकर, एमएसआरडीसी अधीक्षक अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news