

Beed MLA PA fraud case
बीड पुढारी वृत्तसेवा : २५- १५ लेखाशीर्षा मधून गावातील सिमेंट रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मिळवून देतो असे म्हणत 6 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नयन शेजूळ (राहणार छत्रपती संभाजीनगर) याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयन शेजूळ हा आमदार विक्रम काळे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वडवणी तालुक्यातील कान्हापूर येथे उत्तरेश्वर खताळ यांच्या पत्नी राधा खताळ या सरपंच आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामांच्या टेंडर साठी आमदार विक्रम काळे यांचे पीए नयन जयराम शेजुळ याने फोनवर संपर्क साधत टेंडर उपलब्ध करून देतो असे सांगत एक कोटीच्या कामासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती.
ऑगस्ट 2024 मध्ये जिल्हा परिषद आवारात या कामासाठी पन्नास हजार रुपये घेतले होते त्यानंतर सप्टेंबर महिन्यात संभाजीनगर येथे बोलून घेत सुहास लंगडे व समीर शेख यांच्यासमोर 6 लाख 20 हजार रुपये घेतल्याचे उत्तरेश्वर खताळ यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.