

केज/गेवराई : गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेटमधील ठेवीदारांच्या आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. शेतकरी सुरेश जाधव यांच्या आत्महत्येनंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच मल्टीस्टेटमध्ये गुंतवलेले एक लाख रुपये बुडल्याच्या नैराश्यातून, केज तालुक्यातील एका होतकरू कृषी पदवीधर तरुणाने दीड महिन्यापूर्वीच आपले जीवन संपवले होते. ही घटना आता उघडकीस आली आहे.
सुरज शिवाजी तांदळे (रा. कोरेगाव, ता. केज) असे आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे मल्टीस्टेट घोटाळ्याची तीव्रता आणि त्याचे सर्वसामान्यांच्या जीवनावरील भीषण परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
सुरजने २० ऑक्टोबर २०२१ रोजी छत्रपती मल्टीस्टेटमध्ये एक लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली होती. मुदत संपल्यानंतर त्याला १ लाख ८ हजार २५० रुपये परत मिळणे अपेक्षित होते. मात्र, पैसे परत मिळवण्यासाठी त्याने मल्टीस्टेटच्या कार्यालयात अनेक खेटे घातले. पैसे मिळत नसल्याने तो इतका हताश झाला होता की, एकदा त्याने गळफास घेण्यासाठी दोर घेऊन मल्टीस्टेटचे कार्यालय गाठले होते, अशी माहिती त्याचा भाऊ आणि वृद्ध आजीने दिली. मात्र, तरीही अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
अखेर, सर्व बाजूंनी निराशा पदरी पडल्याने, सुरजने ३ मे रोजी सकाळी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, केज आणि नंतर अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, ४ मे रोजी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
सुरजच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याची आई काही वर्षांपूर्वी एका अपघातात मरण पावली असून, वडील मानसिक आजाराने त्रस्त आहेत. घरात लहान भाऊ आणि वृद्ध आजी असा परिवार आहे. सुरजच्या मृत्यूनंतर कुटुंबात कोणी पाठपुरावा करणारे नसल्याने हे प्रकरण दाबले गेले होते.
मात्र, १८ जून रोजी खळेगाव येथील शेतकरी सुरेश जाधव यांनी ९ लाख रुपयांसाठी मल्टीस्टेटच्या दारातच गळफास घेतल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. या घटनेनंतर चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन मल्टीस्टेटला सील ठोकण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, सुरज तांदळे याच्या आत्महत्येसही चेअरमन संतोष भंडारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.