

गजानन चौकटे
एकीकडे भौतिक सुखांच्या मागे धावणारं जग आणि दुसरीकडे, साध्या हातगाडीवर भाजी विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून माणुसकीचा झरा जिवंत ठेवणारा एक तरुण... ही गोष्ट आहे कपिलेश्वर चंद्रकांत हादगुले या युवकाची, ज्याने केवळ बोलून किंवा विचार करून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
दिवसभर गल्लोगल्ली फिरून, भाजी विकून मिळणाऱ्या ३००-५०० रुपयांच्या कमाईतून कपिलेश्वर केवळ स्वतःचा उदरनिर्वाह करत नाही, तर त्याने सहारा अनाथालयातील ‘संध्या’ नावाच्या एका चिमुकलीच्या पालकत्वाची जबाबदारी उचलली आहे. पैशाने श्रीमंत नसला, तरी मनाने कितीतरी मोठा असलेल्या या तरुणाची कहाणी प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.
अनाथालयात एका कोपऱ्यात शांत बसलेली, डोळ्यांत अनेक प्रश्न घेऊन पाहणारी संध्या कपिलेश्वरला पहिल्यांदा दिसली. तो क्षण तिच्या आणि कपिलेश्वरच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. "तिच्या डोळ्यांत एक आर्तता होती, कोणीतरी आपल्याला आधार देईल अशी एक अपेक्षा होती. त्याच क्षणी मी ठरवलं की या मुलीच्या आयुष्यातला अंधार दूर करायचा," हे सांगताना कपिलेश्वरचा गहिवरून येतो.
आज भाजी विकून मिळणाऱ्या पैशातून तो संध्यासाठी कपडे खरेदी करतो, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला जग जिंकल्याचा अनुभव येतो. एवढ्यावरच न थांबता, आता संध्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा संकल्पही त्याने केला आहे. "मी दिवसभर उन्हात फिरतो, पण जेव्हा ती मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहील, तो क्षण माझ्यासाठी सर्वस्व असेल," असे तो आत्मविश्वासाने सांगतो.
"पैसे नसले तरी चालतील, पण मन मोठं हवं. कपिलेश्वरसारख्या दात्यांमुळेच आम्ही अनेक अनाथांचं आयुष्य सावरू शकलो आहोत."
– संतोष गर्जे, संचालक, सहारा अनाथालय
कपिलेश्वरचा सेवाभाव केवळ संध्यापुरता मर्यादित नाही. तो दर महिन्याच्या २० तारखेला न चुकता सहारा अनाथालयात अन्नदान करतो. इतकेच नाही, तर परिसरातील भटक्या श्वानांसाठी तो रोज ५० रुपयांची बिस्किटे खाऊ घालतो. त्याची ही कृती दाखवून देते की, मदत करण्यासाठी केवळ इच्छाशक्ती महत्त्वाची असते, बँक बॅलन्स नाही.
मोठमोठ्या गाड्या आणि बंगले असणाऱ्यांना जे सुचलं नाही, ते एका भाजी विकणाऱ्या तरुणाने करून दाखवलं आहे. कपिलेश्वर हादगुले हे नाव आज केवळ एका भाजी विक्रेत्याचे नाही, तर निस्वार्थ सेवा आणि खऱ्या श्रीमंतीचे प्रतीक बनले आहे. तो समाजासाठी एक अशी प्रकाशवाट आहे, जी दाखवून देते की माणुसकी अजूनही जिवंत आहे आणि ती जगवण्यासाठी पैशाची नाही, तर मोठ्या मनाची गरज असते.