

केज : प्लॉटमध्ये नामफलक लावण्यास विरोध केल्यावरून आमदार मुंदडा समर्थक कार्यकर्त्याने पर्यावऱण मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तारेचे कुंपण तोडून पत्र्याच्या शेडची तोडफोड केली. भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षाच्या मुलाने तक्रार दिली. या प्रकरणी चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. (Beed Crime News)
राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांचे निकटचे समर्थक आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषा मुंडे व त्यांचे पती रमाकांत मुंडे यांच्या नावे असलेल्या बीड रस्त्यालगतच्या सर्वे नं. ४८/२ मधील प्लॉटमध्ये ३१ मार्च रोजी रात्री ८ वाजता आ. मुंदडा समर्थक सुनील देविदास घोळवे हे त्यांच्या नावाचा नामफलक लावत असल्याची माहिती त्यांच्या पेट्रोल पंपावरील कामगारांनी दिली. त्यावरून त्यांचा मुलगा मधुर रमाकांत मुंडे हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी आमच्या जागेत नामफलक लावू नका, असे सांगितले.
त्यावरून सुनील घोळवे व इतर तिघांनी मधुर मुंडे यांना शिवीगाळ करत मारहाण करीत प्लॉटला तारेचे कुंपण तोडून पत्र्याच्या शेडची तोडफोड केली. तुम्ही प्लॉटवर येऊ दिले नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही. तसेच मुंडे यांना सुनील घोळवे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार मधुर मुंडे यांनी दिल्या वरून सुनील घोळवे व इतर अनोळखी तिघांविरुद्ध केज पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक त्रिंबक सोपणे करीत आहेत.