

केज :- केज शहरातून रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला शहरातील एका कॅफेमध्ये नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
दि. २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास केज शहरातून एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने अपहरण केले. तिला केज येथील हनुमान मंदिरा शेजारी अंकु कॅफे नावाच्या कॅफे नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. त्या नंतर पिडीतेने ही सर्व माहिती तिच्या पालकांना सांगितली. त्या नंतर पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपी विरुद्ध ॲट्रॉसीटीसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे केज शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे तपास करीत आहेत.
अपहरणाच्या गुन्ह्या नंतर झाला गंभीर गुन्हा दाखल
सदर अल्पवयीन मुलीचे दि. २० नोव्हेंबर रोजी अल्पवयीन मुलगी, तिची बहिण व भाऊ हे तिच्या वडिलांच्या आजी सोबत एका खोलीत तर आई वडील एका खोलीत झोपले होते. रात्री १:३० वाजता अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. ती घरात नसल्याचे निदर्शनास येताच आजीने तिच्या आई वडिलांना माहिती दिली. त्या नंतर त्या मुलीच्या वडिलांनी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास केज पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
आरोपी सुद्धा अल्पवयीन
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कॅफे मध्ये घेऊन जात तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करणारा आरोपी देखील १७ वर्षाचा आहे.
उदघाटनापूर्वीच कॅफेत अत्याचार
केज शहरात हनुमान मंदिरा समोर अर्जुन काळे या तरुणाने अंकू कॅफे सुरू केला आहे. अद्याप त्याचे उद्घाटन देखील झालेले नाही. आरोपी आणि कॅफे चालक अर्जुन काळे हे मित्र आहेत. आरोपीने रात्री कॅफेत आराम करण्यासाठी म्हणून अर्जुन काळे याच्याकडून कॅफेची चावी घेतली. आणि त्यांनी रात्री अल्पवयीन मुलीला त्या कॅफेत घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला.
कॉफी शॉप, कॅफे आणि स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक धंदे
शहरात कॉफी शॉप, कॅफे आणि स्पा सेंटर नावाखाली तरुण तरुणींना एकांत उपलब्ध करून देण्यासाठी आडोसा व स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्या जातात. त्या ठिकाणी धूम्रपान देखील केले जात आहे. अशा धंद्याच्या गोंडस नावाखाली अशा कॉफी शॉप, कॅफे आणि स्पा सेंटर्स चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.