

बीड : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील एका आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एस.एस. घोरपडे यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणात सहा. सरकारी वकील ॲड. अजय श्रीमंतराव तांदळे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली.
ऑगस्ट २०२३ आणि १ सप्टेंबर २०२३ रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ केला होता. ही घटना पीडितेच्या घरी घडलेल्या भांडणानंतर उघडकीस आली. २ सप्टेंबर रोजी पीडितेच्या म्हणण्यानुसार, शाळा सुटल्यावर घरी जात असताना एका आरोपीने तिला घरात ओढून नेले आणि तिच्यावर लैंगिक छळ केला. त्याच वेळी तिचा भाऊ दारातून आवाज दिल्याने आरोपी घाबरून तिला सोडून पळून गेला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक डी. बी. कोळेकर, पिंक पथक आष्टी यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एस.एस. घोरपडे यांच्या न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष, प्रत्यक्षदर्शी पुरावे, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकाऱ्यांचे पुरावे आणि सरकारी वकील ॲड. अजय तांदळे यांच्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उर्वरित दोन आरोपी हे विधीसंघर्षग्रस्त बालक असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध वेगळे दोषारोपपत्र बाल न्याय मंडळ, बीड येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणात सहा सरकारी वकील ॲड. अजय श्रीमंतराव तांदळे यांना ॲड. पी.बी. जगताप यांनी सहकार्य केले तर सरकारी वकील अजय राख यांचे मार्गदर्शन राहिले होते.