

बीड : शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एका 28 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अमली पदार्थसदृश प्लास्टिकच्या सीलबंद लेबलविरहित 160 बाटल्या तसेच एक दुचाकी असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ठाणे पेठ बीड हद्दीतील चांदणी चौक ते काळा हनुमान चौक जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरुन अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
पोलिसांनी संशयित इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अफताब सलीम खान पठाण (वय 28, रा. दाऊदपूरा पेठ, बीड) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून अंदाजे 40 हजार रुपये किमतीच्या 160 बाटल्या आणि सुमारे 75 हजार रुपये किमतीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अफताब सलीम खान पठाण याच्याविरुद्ध ठाणे पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमल व औषध प्रशासनासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
पेठबीड भागात मोठे नेटवर्क
बीडमध्ये नशा करण्यासाठी औषधांची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. विशेषतः शिवाजीनगर, बीड शहर व पेठबीड अशा तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये हे नेटवर्क काम करत आहे. अगदी गल्लीबोळातील ठराविक दुकानांमध्ये सर्रास अशा बॉटल्स आणि गोळ्यांची विक्री केली जात आहे. या औषधांच्या नशेत फिरणारे तरुण सर्रासपणे गुन्हेगारी कृत्य करत असताना पोलिसांकडून मात्र तेवढ्या व्यापक प्रमाणात कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.