

कन्नड : प्रवासी सोडून घरी परतणाऱ्या टेम्पोचालकाला कांदा चोरीचा संशय घेत शिवीगाळ करून लोखंडी शॉकअप व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील औराळा शिवारात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दवगाव रंगारी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत उद्धव वाल्मिक तुपे (३५, रा. बाभुळगाव बु., ता. वैजापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी रात्री ते छोट्या हत्ती टेम्पो (एमएच-२० ईएल-२३९८) मधून प्रवासी सोडून घरी परतत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास औराळा गावाजवळ लघुशंकेसाठी ते थांबले असता तीन व्यक्ती तेथे आल्या.
तुपे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांनी त्यांच्यावर कांदा चोरीचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त करून शिवीगाळ केली. तुपे यांनी आपली ओळख सांगून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्यांना लोखंडी शॉकअपने तसेच लाथाबुक्क्यांनी उजव्या पायावर व छातीवर मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यातील एका व्यक्तीची ओळख दीपक कडू जिवरख (रा. औराळा) अशी पटल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेनंतर तुपे यांना उपचारासाठी देवगाव रंगारी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणीदरम्यान त्यांच्या उजव्या पायाचे हाड फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
उपचारानंतर तुपे यांनी शुक्रवारी (ता. ४) देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.