

Beed Kej teacher molestation case
केज : केज तालुक्यातील सुर्डी (सोनेसांगवी) येथील जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने चक्क सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढून शिक्षण क्षेत्राला आणि शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. हा खळबळजनक प्रकार उघड झाल्यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
दि.३ जुलै २०२५ रोजी गुरुवारी दुपारी २:०० वा. च्या दरम्यान शाळेच्या मध्यंतर वेळी कॅरम खेळत असलेल्या सहावीच्या मुलींच्या अंगाला वाईट हेतूने स्पर्श केला आणि त्यांच्याशी तुमचे नवरे निवडा, अशा प्रकारे बोलून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या नंतर एका मुलीनी हा प्रकार घरी तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर दि. ८ जुलै रोजी एका पालकाने गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बाबतची लेखी तक्रार त्यांना सादर केली. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ स्वतः गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, केंद्र प्रमुख अर्जुन बोराडे व केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली.
सदर प्रकाराविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (प्रा.) फुलारी यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी या दोषी शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावर असल्याची माहिती दिली.
पीडित मुलीच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली असून त्यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी त्या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल झालेला नाही.
मागील वर्षी देखील या शिक्षकाने एका शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता परंतु त्याची गावात वाच्यता झाल्या नंतर सदर प्रकरण हे गावातच तडजोड करून मिटविण्यात आले असल्याची माहिती समजते आहे.
या प्रकरणी पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही परंतु त्यांनी गटक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असल्याने त्या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती द्यायला हवी. कारण सदर शिक्षक हा सावकारी आणि प्लॉटिंगच्या व्यवसायात असल्याने तो पालकावर दडपण आणण्याची शक्यता आहे.
गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देऊन माहिती घेतली असता त्या नराधमाने त्याने केलेल्या गैरकृत्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळत असून चौकशी अहवालात गट शिक्षणाधिकारी यांनी त्याचा उल्लेख केला असल्याची माहिती मिळते आहे.
या भयानक प्रकारामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबत शिक्षकाशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद आहे.
या प्रकरणी पालकांचा तक्रार अर्ज प्राप्त होताच आम्ही शाळेला भेट देऊन चौकशी केली असून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला आहे.
- लक्ष्मण बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, केज