

मुंबई : बीड जिल्ह्यात खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या प्रकरणातील आरोपींना आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणार्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी बीड येथील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य बीडमध्ये घडले आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन नराधमांकडून एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार घडला आहे. या दोन्ही आरोपींना अटक झाली; मात्र एवढ्या गंभीर गुन्ह्यात केवळ तीन दिवसांची पोलिस कोठडी का मागितली, या आरोपींच्या मागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का? त्यांच्यामागे कुणीतरी गब्बर राजकारणी उभे आहेत का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच, तपासासाठी काही विशेष यंत्रणा उभी करणार का? असाही प्रश्न केला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपींना तीनच दिवसांची कोठडी का मागण्यात आली, यासंदर्भात चौकशी केली जाईल. या प्रकरणात राज्यात मोठ्या प्रमाणात रोष असून, याची व्याप्ती अधिक असू शकते, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.