

Kej Road Block Protest
केज : फलटणच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधीवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि.२५) केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केज विकास संघर्ष समिती, शेकाप व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
धारूर तालुक्यातील महिला फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होती. या ठिकाणी त्यांना आरोपीच्या फिटनेस प्रमाण- पत्राच्या कारणा वरून पोलिस अधिकारी, खासदार लोकप्रतिनिधी व इतर काही लोकांकडून प्रचंड दबाव टाकला जात होता. यासाठी त्यांचा लैंगिक, मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
सध्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले अनेक तरुण-तरुणी मोठ्या शहरात मोठी हॉस्पिटल उभी करून रूग्णांना वैद्यकीय सेवा देतात. पीडित तरुणीने डोंगरी भाग असलेल्या धारूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेऊन फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूग्णांना आरोग्य सेवा देत होती.
आपली सेवा बजावताना पीडितेने होत असलेल्या त्रासाबद्दल आपल्या वरिष्ठांना कळवले होते. परंतू तिचे म्हणणे वरिष्ठांनी गांभीर्याने घेतले नाही. अखेर होणारा त्रास असाह्य झाल्याने मुंडे या तरूणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. या तरूण डॉक्टरच्या आत्महतेस कारणीभूत असलेल्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, मोहन गुंड, महेश जाजू, नासेर मुंडे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांच्या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी स्वीकारले.