

Two Wheeler Theft Case Beed
केज : मारहाण करून मोटारसायकल जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या चोराला केज पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गणेश लोंढे यांच्या तक्रारीवरून जुबेर उर्फ मारी मुस्ताक फारोकी व उमेर उर्फ पापा मुस्ताक फारोकी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ८.३० वाजता गणेश रमेश लोंढे व त्यांचा मित्र रितेश शिवाजी घुले हे केज बसस्थानकाजवळ शुभम भोसले यांच्या टपरीसमोर उभे होते. त्यावेळी जुबेर उर्फ मारी मुस्ताक फारोकी हा तेथे आला व गणेश लोंढे यांना, “तू आणि तुषार मेटे यांनी माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली?” असे म्हणत मारहाण केली. त्याचवेळी त्याचा भाऊ उमेर उर्फ पापा मुस्ताक फारोकी देखील घटनास्थळी आला.
दोघांनी मिळून गणेश लोंढे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गणेश लोंढे व रितेश घुले यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल (क्र. MH 44 X 2371) जबरदस्तीने हिसकावून घेऊन आरोपी त्या गाडीवरून पळून गेले.
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम व पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलीस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलीस कॉन्स्टेबल किशोर गोरे व पोलीस कॉन्स्टेबल मेहेत्रे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान जुबेर उर्फ मारी फारोकी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीस गेलेली मोटारसायकल फलोत्पादन विभागाच्या जागेत गवतात लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार सदर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.