

परळी वैजनाथ : सिरसाळा येथे उसणे दिलेल्या पैशांच्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजू गंगाराम उबदे (वय ४०, रा. सिरसाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायलू रामलू पस्तमवाड व गंगा पस्तमवाड (दोघेही रा. सिरसाळा) यांच्यात संजू उबदे यांच्याशी पैशांच्या कारणावरून तीव्र वाद झाला. वादाचे रूपांतर धक्काबुक्की व हाणामारीत झाले. या दरम्यान सायलू पस्तमवाड याने संजू उबदे यांना पाठीवर जोरदार धक्का दिल्याने तोल जाऊन ते तोंडावर पडले आणि गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना उपचारासाठी हलविण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी सायलू रामलू पस्तमवाड याला ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित गंगा पस्तमवाड याचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.