Beed Farmer News : परिस्थितीमुळे नामदेवाने घेतले स्वतःच्या खांद्यावर जू, केज तालुक्यातील शेतकऱ्याची व्यथा
Beed Kaij Farmer news
केज, पुढारी वृत्तसेवा: अल्प शेती. त्यात बैल बारदाना सांभाळणे परवडत नाही आणि शेती त्या शिवाय कसता येता नाही. तसेच नांगरणी, पेरणी जरी ट्रॅक्टरने केली; तरी एवढ्या छोट्या जमिनीच्या तुकड्यात पेरणी केल्या नंतर मग आंतरमशागत कशी करावी? म्हणून केज तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क वखराचे जू आपल्या खांद्यावर घेत कारभारणीच्या मदतीने वखरणी सुरू केली.
केज तालुक्यातील चंदनसावरगाव या हाय-वेवरच्या गावापासून एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या भाटुंबा छोट्या गावात राहत असलेले शेतकरी नामदेव मोरे यांना भाटुंबा येथे सव्वा एकर जमीन आहे. ती थोडी जमीन आणि लोकांच्या शेतात मोलमजुरी करून त्यांचे कुटुंब गुजरान करीत आहे.
आता पूर्वी सारखे बैल-बारदाना ठेवणे अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडत नाही. म्हणून नामदेव मोरे हे त्यांच्या जमीन ही ट्रॅक्टरने नांगरणी, पाळी, पेरणी करून घरीच कसत आहेत. मात्र नांगरणी, पाळी, पेरणी जरी आता ट्रॅक्टरने करता येत असली. तरी छोट्या शेतकऱ्यांना पिकातील आंतरमशागत करण्यासाठी मजूरही लवकर मिळत नाहीत आणि ज्यांच्याकडे बैल व वखर असलेले मजुरी काम करणारे देखील उपलब्ध होत नाहीत.
मग सोन्यासारखे पिक आलेले असताना त्याची जर व्यवस्थित आणि वेळ-वर वखरणीसारखे आंतरमशागत केली नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून नामदेव मोरे यांनी त्यांची अर्धांगिनी अंजना हिच्या मदतीने सोयाबीनची कोळपणी आणि वखरणी करण्यासाठी चक्क वखराचे जू स्वतः च्या खांद्यावर घेऊन ढोर मेहनत करायला सुरुवात केली.
तर वखराचा कासरा आणि येसकी पत्नीच्या हातात दिली. जे वखाराचे जू बैलाच्या खांद्यावर असते ते जू मालकाच्या खांद्यावर बघून आणि ते ओढीत असताना काळीज आणि जीव पिळवटून जात होता. पण मेहनत केल्याशिवाय पीक कसे येईल असा विचार करून मन घट्ट करून मी हातात कासरा घेऊन वखरणी सुरू केली अशी प्रतिक्रिया अंजना मोरे यांनी व्यक्त केली.

