

Elderly Man Cheated Kaij
गौतम बचुटे
केज: घरात गुप्तधन असल्याचे आमिष दाखवून ते बाहेर काढून देण्याच्या बहाण्याने केज तालुक्यातील बेलगाव येथील एका वृद्धाची सुमारे साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी केज पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुख्य आरोपीसह एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्याला अटक करून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलगाव येथील सिताराम आश्रुबा घुले यांची अमरावती जिल्ह्यातील सावरखेड (ता. मोरशी) येथील कान्हा रतनसिंग चव्हाण याच्याशी ओळख झाली होती. जडीबुटीची औषधे विकणाऱ्या कान्हाने घुले यांच्या घरात गुप्तधनाचे हंडे असून ते बाहेर काढण्यासाठी दुर्मिळ औषधी वनस्पतींची आवश्यकता असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर औषधी वनस्पती खरेदीच्या नावाखाली त्याने घुले यांच्याकडून ३ लाख ३ हजार ५०० रुपये उकळले. यासाठी बीड येथील सुभाष रोडवरील अष्टविनायक आयुर्वेदिक भवनातील औषध विक्रेता अमोल दिगंबर गिरी याच्याकडून तब्बल २ लाख ६० हजार रुपयांची औषधी खरेदी करण्यास भाग पाडल्याचे तपासात समोर आले आहे.
इतके करूनही आरोपीने आणखी ३ लाख ४५ हजार रुपयांची औषधी लागेल, अन्यथा गुप्तधन मिळणार नाही, असे सांगत पुन्हा पैशांची मागणी केली. एवढी रक्कम नसल्याने सिताराम घुले यांनी मुलांकडे पैशांची मागणी केली. मुलांनी चौकशी केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी खरी बाब सांगितली नाही. मात्र त्यांच्या पत्नीने गुप्तधनाच्या आमिषाचा संपूर्ण प्रकार मुलांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने केज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
आरोपी कान्हा चव्हाण याने गुप्तधन बाहेर काढण्यासाठी घरात खड्डा खोदण्यास सांगितले. त्यानंतर रात्री पूजा करून तांब्याची कळशी पांढऱ्या कपड्यात बांधून गुप्त ठेवण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच हा प्रकार कुणालाही सांगू नये, अन्यथा वंशाचा नाश होईल किंवा अनिष्ट घटना घडतील, अशी भीती दाखवून घुले यांना मानसिकदृष्ट्या दबावाखाली ठेवले.
तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने आणि पोलिस नाईक तरकसे यांच्या पथकाने अवघ्या २४ तासांत मस्साजोग परिसरातून कान्हा चव्हाण आणि बीड येथून औषध विक्रेता अमोल गिरी याला ताब्यात घेतले. आरोपींकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
बेलगाव येथे जडीबुटीच्या औषधांचा व्यवसाय करणाऱ्या कान्हा चव्हाणकडे उपचारासाठी गेलेल्या सिताराम घुले यांची त्याच्याशी ओळख झाली. त्यानंतर घुले यांनी त्याला घरी नेल्यावर घरात गुप्तधन असल्याचा दावा करत त्याने औषधी वनस्पतींच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी कान्हा रतनसिंग चव्हाण आणि आयुर्वेदिक औषध विक्रेता अमोल दिगंबर गिरी यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६, ३(५) आणि ३(२) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर करीत आहेत.