

वडवणी : घरगुती वादातून पोटच्या मुलाने जन्मदात्याची विटेने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे सोमवारी (दि.२७) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना घडली.
श्रीकीसन भागोजी कोठुळे (वय ७०) असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव असून याप्रकरणी नातू शुभम फुलचंद कोठुळे (वय २०, व्यवसाय मजुरी, रा. चिंचवण) याने दिलेल्या फिर्यादीवरून फुलचंद श्रीकीसन कोठुळे याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे चिंचवण गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवण येथील कोठुळे कुटुंबाच्या राहत्या घरी सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान घरगुती कारणावरून वाद सुरू होता. घरातील ज्येष्ठ व्यक्ती असलेले श्रीकीसन कोठुळे यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाच प्रचंड राग मनात धरून त्यांचा मुलगा आरोपी फुलचंद कोठुळे याने, "तुम्ही आमच्या भांडणात सारखे का पडता?" असे म्हणत अंगणात पडलेली वीट उचलून थेट त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मारली. या अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यात श्रीकीसन कोठुळे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. डोक्याला अन् चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मयताचे नातू शुभम फुलचंद कोठुळे (वय २०) याने मंगळवारी (दि.२८ ) वडवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्याच वडिलांविरुद्ध तक्रार दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी फुलचंद श्रीकीसन कोठुळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.