

केज: तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बनसारोळा येथे महेंद्र गायकवाड यांच्या शेतात बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू होता. युसूफवडगाव पोलिसांनी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता या अड्ड्यावर धाड टाकत 5 जणांना अटक तसेच त्यांच्याकडून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केला.
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने 'तीर्रट' नावाचा जुगार खेळणाऱ्या सात जणांना पाहिले. पोलिसांना पाहताच त्यातील दोघांनी पळ काढला, मात्र विष्णु शंकर दळवी, बालाजी भारत कावळे, अतिनंद रामा कांबळे, गणेश दिगंबर फसके आणि महादेव भागवत राऊत या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी रोख 5 हजार 200 रुपये आणि जुगाराच्या साहित्यासह 5 मोटारसायकली असा एकूण 2 लाख 48 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस हवालदार धनंजय कारले यांच्या फिर्यादीनुसार, सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.