

केज: केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळखीचा गैरफायदा घेऊन आणि शिवीगाळ करून 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या खिशातील तब्बल दोन लाख रुपये काढून घेतल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय घडली?
गुरूवारी (दि.30 ऑक्टोबर) रात्री 8:00 वाजण्याच्या सुमारास ही घटना कोल्हेवाडी (ता. केज) येथे घडली. तुकाराम सोपान चौरे (रा. तुकुचीवाडी ह. मु. कोरेगाव) आणि नवनाथ तांदळे (रा. कोरेगाव) या दोन आरोपींनी वैजनाथ धोंडिबा आंधळे (रा. कोल्हेवाडी) या 75 वर्षीय वृद्धाला शिवीगाळ केली आणि त्यांच्या 'ओळखी'चा गैरफायदा घेत त्यांच्या खिशात असलेले रोख दोन लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
गुन्हा दाखल
याप्रकरणी, वैजनाथ आंधळे यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आरोपी तुकाराम सोपान चौरे आणि नवनाथ तांदळे यांच्याविरुद्ध गु. र. नं. 601/2025 भा. न्या. सं. 119(1), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनवणे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.