

Plastic Broom Impact
गजानन चौकटे
गेवराई : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात लक्ष्मीचे प्रतीक मानून ज्या केरसुणीचे श्रद्धेने पूजन केले जाते, ती केरसुणी तयार करणाऱ्या कारागिरांच्या घरात मात्र आर्थिक अडचणींचे सावट आहे. बदलती जीवनशैली, प्लास्टिकच्या झाडूंचा वाढता वापर आणि आधुनिक स्वच्छता साधनांमुळे पारंपरिक केरसुणीची बाजारपेठ दिवसेंदिवस कमी होत आहे. पिढ्यान्पिढ्या या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांसमोर आता आपला पारंपरिक व्यवसाय टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दिवाळी जवळ आली की घराघरांत स्वच्छतेची लगबग सुरू होते. अंगणापासून उंबरठ्यापर्यंत आणि घराच्या कानाकोपऱ्यापर्यंत स्वच्छता केली जाते. पूर्वी या कामासाठी पारंपरिक केरसुणी आणि फड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीचे पूजन करण्याची परंपराही आज अनेक घरांमध्ये कायम आहे. मात्र, वर्षभर या वस्तूंना मर्यादित मागणी असते. दिवाळीच्या काळातच काही प्रमाणात विक्री वाढत असल्याने या व्यवसायातील विक्रेत्यांचे आर्थिक गणित प्रामुख्याने सणाच्या हंगामावर अवलंबून असते.
यंदा मात्र पारंपरिक केरसुणी व्यवसायाला महागाईची मोठी झळ बसली आहे. केरसुणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच कुशल कामगार मिळणेही कठीण झाले आहे. दुसरीकडे आकर्षक रंगांचे प्लास्टिकचे झाडू आणि मशीननिर्मित स्वच्छता साधनांचा बाजारातील वापर वाढत आहे. सहज उपलब्धता आणि बदलत्या राहणीमानामुळे ग्राहकांचा कलही आधुनिक पर्यायांकडे वळला आहे.
विशेषतः शहरांमधील फ्लॅट संस्कृतीमुळे पारंपरिक केरसुणीची मागणी घटल्याचे विक्रेते सांगतात. पूर्वी अनेक घरांमध्ये वर्षातून अनेकदा पारंपरिक फडे खरेदी केले जात होते. आता मात्र दिवाळीपुरतीच खरेदी केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वर्षभर व्यवसाय सुरू ठेवणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे विक्रेत्यांसाठी कठीण बनले आहे.
यंदा गतवर्षीच्या तुलनेत फड्यांच्या दरात सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकारानुसार मोठा फडा ५० ते ६० रुपये, तर लहान फडा ३० ते ४० रुपये दराने विकला जात आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, मजुरांची अनुपलब्धता आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे दर वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
वास्तविक, केरसुणी हे केवळ स्वच्छतेचे साधन नसून आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छता असलेल्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो, अशी श्रद्धा आजही कायम आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीला विशेष महत्त्व दिले जाते. मात्र, ज्या वस्तूला लक्ष्मीचे प्रतीक मानून पूजले जाते, ती तयार करणाऱ्या कष्टकरी कारागिरांच्या घरातच आर्थिक स्थैर्याचा अभाव असणे, ही बदलत्या काळातील विसंगती आहे.
आधुनिकतेचा स्वीकार करताना पारंपरिक व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे अस्तित्वही जपण्याची गरज आहे. दिवाळीच्या निमित्ताने पारंपरिक केरसुणीची खरेदी करणे म्हणजे केवळ एक वस्तू घेणे नव्हे, तर पिढ्यान्पिढ्या हा व्यवसाय जपणाऱ्या कष्टकरी हातांना आर्थिक आधार देणेही आहे.
दिवाळीपुरतीच मिळते बाजारपेठ!
पारंपरिक केरसुणी आणि फड्यांना वर्षभर मर्यादित मागणी असते. मात्र, दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर विक्रीत काही प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या व्यवसायातील विक्रेते दिवाळीच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात. सण संपल्यानंतर पुन्हा मागणी मंदावते आणि व्यवसायाला उतरती कळा लागते.
आकारानुसार फड्यांचे दर
मोठा फडा : ५० ते ६० रुपये
लहान फडा : ३० ते ४० रुपये
पारंपरिक केरसुणी तयार करण्यासाठी आता कामगार मिळत नाहीत. फ्लॅट संस्कृतीमुळे आणि प्लास्टिक व मशीननिर्मित झाडूंचा वापर वाढल्यामुळे पारंपरिक फड्यांची मागणी कमी झाली आहे. कच्चा माल मिळत नसल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे यंदा दरात वाढ करावी लागली.
— आनंद सूर्यवंशी, फडा विक्रेता
लक्ष्मीपूजनासाठी घराघरांत केरसुणीच्या पूजन करण्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो, अशी आमची श्रद्धा आहे. आधुनिक झाडू आले तरी पारंपरिक केरसुणीचे महत्त्व कायम राहायला हवे.
— संगिता भारती, गृहिणी