

Beed Dussehra Melava and businessmen's loss
नेकनुर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सुरू असलेल्या दसरा मेळाव्यामुळे ग्रामीण बाजारपेठेला अवकळा आल्याचे पहायला मिळाले. सावरगावघाट मेळावा आणि नारायणगड मेळावा दसऱ्या दिवशी आयोजित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात ओढा मेळाव्याकडे असल्याने नेकनूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट होता अशीच स्थिती अनेक बाजारपेठेच्या गावात असल्याने व्यावसायिकांना यामुळे खरेदी केलेल्या मालाकडे पाहत बसण्याची वेळ आली होती.
दसरा आणि दिवाळी या दोन सणासाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेच्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते मात्र मागच्या काही वर्षांपासून जिल्ह्यात सुरू अस-लेले दसरा मेळावे बाजारपेठेला मारक ठरू लागले आहेत. अगोदरच पावसामुळे पंधरा दिवसांपासून व्यापारपेठ शांत होती.
दसऱ्याला उलाढाल होईल या आशेवर बसलेल्या व्यापाऱ्यांच्या पदरी निराशा पडली. गुरुवारी सकाळपासूनच सावरगावघाट आणि नारायणगड येथ होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ग्रामीण भागातून वाहनांची रांग लागली होती.
यामुळे बाजारपेठेची गावे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेकनुरसारख्या ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळाला. या दोन्ही मेळाव्यांसाठी परिसरातील अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात नागरिक जात असल्याने मागच्या दोन वर्षांपासून ऐन दसऱ्यादिवशी बाजारपेठेला अवकळा येत असल्याने व्यापाऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.