Beed Hailstorm : बीड जिल्ह्याला अवकाळीचा भीषण तडाखा

विजांच्या कडकडाटासह ‌‘रौद्ररूप‌’, बळीराजा पुन्हा संकटाच्या गर्तेत; मदतीची मागणी
Beed Hailstorm
बीड जिल्ह्याला अवकाळीचा भीषण तडाखाpudhari photo
Published on
Updated on

बीड : बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अंगाची लाही-लाही करणाऱ्या उकाड्यानंतर बुधवारी सायंकाळी निसर्गाने अचानक रौद्ररूप धारण केले. बीडसह केज, गेवराई, अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या तुफानी अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, वीज कोसळून मनुष्यहानी सह पशुहानी झाल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

या अवकाळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी वीज कोसळून एका व्यक्तीसह गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला. काढणीला आलेली ज्वारी, गहू, बाजरी आणि मका जमीनदोस्त झाले असून केज आणि अंबाजोगाई परिसरात आंब्याचा मोहर आणि कैऱ्या गळून पडल्याने बागायतदारांचे कंबरडे मोडले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि झाडे उन्मळून पडल्याने रात्रीपासून अनेक गावे अंधारात आहेत.

Beed Hailstorm
Maharashtra Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी पाऊस-गारपिटीने पुणे जिल्हा हादरला; पिकांचे प्रचंड नुकसान

गेवराई तालुक्यात सायंकाळी झालेल्या पाऊण तासाच्या पावसाने प्रचंड विध्वंस केला. मेघगर्जना आणि गारांच्या माऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले, तर खरबुजाच्या बागा पाण्यात सडून गेल्या. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून शेतात उभा असलेला मका चिखलात मिसळला आहे. आता जगायचं कसं आणि कर्ज फेडायचं कसं? असा आर्त टाहो भेंडटाकळीचे शेतकरी धनंजय उबाळे यांनी फोडला आहे.

केज तालुक्यात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

अंबाजोगाई आणि माजलगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. येथे अनेक ठिकाणी झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली होती. माजलगाव ग्रामीण भागात काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रतीक्षा आहे.

अचानक आलेल्या या संकटामुळे बाजारपेठेतही मोठी पळापळ झाली. व्यापारी आणि ग्राहकांचे भिजल्यामुळे नुकसान झाले. आता सर्वांच्या नजरा महसूल आणि कृषी विभागाकडे लागल्या आहेत. नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आणि मृतांच्या वारसांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बीडचा शेतकरी आधीच कोलमडला आहे. आता या अवकाळीने उरलेलं पीकही हिरावून नेलं. सरकारने आता तत्काळ आर्थिक आधार द्यावा असे शेतकरी धनंजय उबाळे यांनी सांगितले.

Beed Hailstorm
Solapur unseasonal rain: अवकाळी; गारपिटीने द्राक्ष, आंबासह धान्याचे नुकसान

वीज पडून पालीमध्ये एकजण ठार

विजांच्या कडकडाटासह होत असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान तर होतच आहे. याबरोबरच जीवितहानीच्या घटना देखील होत आहेत. बीड तालुक्यातील पाली येथील वसंतराव राऊत हे माजी सैनिक सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले तर दुसरी घटना गेवराई तालुक्यातील खेर्डावडी येथे घडली असून एका बैलाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या ठिकाणचा पंचनामा करून मनेोहर भारती या शेतकऱ्याला मदत देण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news