

उदय नागरगोजे
बीड ः बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळावी याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके यांचा पाठपुरावा सुरू आहे. आता महिनाभरात शंभर खाटांचे माता-बाल रुग्णालय कार्यान्वित केले जाणार असून याबरोबरच मेमोग्राफी मशीन, कॅथलॅबमध्ये ओपन हार्ट सर्जरी, नॅफ्रॉलॉजीस्ट नियुक्ती, महिलांवरील शस्त्रक्रियेसाठी लॅप्रोस्कोपीचा वापर या विषयावर काम सुरू आहे. येत्या एक ते तीन महिन्यात या सर्व सुविधा रुग्णांना दिल्या जाणार असल्याची माहिती डॉ.सोळंके यांनी दिली.
बीड जिल्हा रुग्णालयातील बाह्य व आंतररुग्ण विभागात दररोज शेकडो रुग्ण दाखल होतात. त्यांना दर्जेदार सुविधा मिळावी याकरिता डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सोळंके यांनी सांगितले. यामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या इमारतीमध्ये माता व बाल रुग्णांना सुविधा देण्यात अडचणी येत आहेत.
यामुळे नव्याने बांधून तयार असलेल्या शंभर खाटांचे माता व बाल रुग्णालय येत्या महिनाभरात कार्यान्वित केले जाणार आहे. याबाबतचे सर्व काम अंतिम टप्प्यात असून लिफ्ट देखील सुरू केल्या जाणार आहेत. यामुळे मूळ जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत इतर रुग्णांसाठी जागा उपलब्ध होणार असून त्या ठिकाणी तळ मजल्यावर दिव्यांगांसाठी विशेष वॉर्ड सुरू केला जाणार आहे.
महिलांच्या स्तनाचा कर्करोग तपासणीसाठी लाखो रुपये खर्च करून मॅमोग्राफी मशीन काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली होती, परंतु ती अक्षरशः धूळखात पडून होती. ही बाब जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याबाबतचा आढावा घेऊन ती कार्यान्वित करण्याबाबत संबंधित पुरवठादारास सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे महिलांच्या कर्करोगासंबंधीची तपासणी या ठिकाणी करता येणार आहे.
याशिवाय जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुसज्ज अशा कॅथलॅबमध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रिया करता यावी याकरिता डॉ.तेजस चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याकरिता आवश्यक त्या सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय नेफ्रॉलॉजीस्ट देखील नियुक्त करण्यात आला असून किडनी स्टोनच्या रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करता येणार असल्याची माहिती डॉ.सोळंके यांनी दिली. जिल्हा रुग्णालयात दाखल रुणांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता आम्ही तत्पर असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत घेतला आढावा!
बीड जिल्हा रुग्णालयासह जिल्हाभरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला आहे. यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयासह इतर ठिकाणच्या रुग्णालयांबाबतचे प्रस्ताव, त्यांचा पाठपुरावा याबाबतची माहिती देखील घेतली आहे. बांधकाम, साहित्य पुरवठा, औषध पुरवठा याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून येत्या आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे.
ब्लड स्टोरेजची क्षमता वाढली
बीड जिल्हा रुग्णालयात ब्लड स्टोरेज सुविधा आहे, परंतु यातील सातपैकी तीन स्टोरेज गेल्या काही महिन्यांपासून बंद होते. ते तत्काळ दुरुस्त करून घेण्यात आले आहेत, यामुळे स्टोरेजची क्षमता वाढली आहे. याबरोबरच दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो, यावरही उपाययोजना करत रुग्णालयीन कर्मचारी, डॉक्टर्स यांनाही रक्तदान मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे डॉ.सोळंके यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयाच्या कामगिरीत सुधारणा
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सोळंके यांनी पदभार घेतल्यापासून जिल्हा रुग्णालयाच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. यापूर्वीच्या काळात बीडचे जिल्हा रुग्णालय राज्यस्तरावरील नामांकनामध्ये शेवटच्या पाचमध्ये होते ते आता पहिल्या पंचवीसमध्ये आले आहे. यापुढेही सातत्याने कामगिरीत सुधारणा करण्याचा मानस असल्याचे आणि त्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचे डॉ.सोळंके यांनी सांगितले.