

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी भरधाव वेगाने घुसणाऱ्या कारला (क्रमांक MH14 DT 3514) रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या हवालदारावरच चालकाने गाडी घालून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत पोलिस हवालदार गंभीर जखमी झाला असून आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव गाडीने तब्बल ८० मीटर फरफटत नेले, हवालदार गंभीर जखमी
युवराज प्रल्हाद श्रीडोळे (वय ३६) असे त्या जखमी हवालदाराचे नाव आहे. युवराज श्रीडोळे हे सध्या दिंद्रुड (ता. माजलगाव) ठाण्यात नेमणुकीवर आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० ऑगस्ट रोजी ते पोलीस उपनिरिक्षक राठोड, पो.ह. बाहीरवाळ, साळुंके, होमगार्ड धायजे या सहकाऱ्यांसह नित्रुड गावात अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडत होते.
रात्री ८ ते ८.१५ च्या दरम्यान नुराणी मशिदीजवळ बंदोबस्त सुरू असताना काळ्या रंगाची XUV 500 गाडी पोलिसांच्या गाडीच्या सायरनसारखा आवाज करत बेदरकारपणे भरधाव वेगाने आली. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी चालकास लांबूनच हात दाखवून वाहन थांबवून बाजूला घेण्याचा इशारा केला. मात्र, मस्तवाल चालकाने पोलिसांच्या अंगावरच वाहन घातले. यावेळी वाहन रोखण्यासाठी समोर आलेले युवराज श्रीडोळे यांना चालकाने जवळपास ८० मीटर फरफटत नेत गंभीर जखमी केले आणि गाडीसह पळून गेला जखमी झालेल्या श्रीडोळे यांना त्यांचे सहकारी आणि उपस्थित नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत
या प्रकरणी युवराज श्रीडोळे यांनी दिलेल्या जबाबावरून आरोपी वाहनचालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा, खुनाचा प्रयत्न व निष्काळजीपणे वाहन चालवणे या गंभीर गुन्ह्यांखाली दिदड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.